डॉ.केशवराव धोंडगे यांच्याकडून कष्टकरी, कामगारांसाठी आयुष्य समर्पित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - latur saptrang

Breaking

Wednesday, August 24, 2022

डॉ.केशवराव धोंडगे यांच्याकडून कष्टकरी, कामगारांसाठी आयुष्य समर्पित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 24 : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. केशवराव धोंडगे यांनी कष्टकरी, कामगार व दिनदुबळ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांचा गौरव केला. डॉ.केशवराव धोंडगे यांना दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांच्या संसदीय व सामाजिक कार्याचा गौरव आज विधानसभेत करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विरोधी पक्ष नेते अजित पवार सर्वश्री सदस्य बाळासाहेब थोरात, भास्करराव जाधव, श्यामसुंदर शिंदे, हरिभाऊ बागडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, केशवरावजी शंकरराव धोंडगे यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी मन्याड व पार्वती नदीच्या खोऱ्यात वसलेल्या गऊळ गावी झाला. त्यांचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले. त्यांनी १९४८ मध्ये श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून ज्ञानदानाचे कार्य केले. औरंगाबाद, नांदेड, कंधारमधील वाडी तांड्यावरच्या मुलामुलींना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली. १२ प्राथमिक शाळा, ११ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, दोन वरिष्ठ महाविद्यालये व एक विधी महाविद्यालय सुरु केले. हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. आणीबाणीच्या काळात कारावासही भोगला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, जनतेच्या न्याय हक्कासाठी श्री.धोंडगे यांनी अनेक आंदोलने केली. त्यांनी ‘वंदे मातरम्’ गीताने दोन्ही सभागृहांच्या सत्राचा प्रारंभ व्हावा, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार डिसेंबर, १९९० पासून दोन्ही सभागृहांच्या सत्रांचा प्रारंभ ‘वंदे मातरम्’ गीताने होऊ लागला आहे. मराठवाडा विकासासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करणे, लोहा तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण असावे यासाठीही विशेष प्रयत्न केले.

नांदेड जिल्ह्यात एसटी डेपोची मागणी, विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात महात्मा फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य शासनाच्यावतीने प्रकाशित करणे अशा अनेक मागण्या त्यांनी शासन दरबारी मंजूर करुन घेतल्या. विविध संसदीय आयुधाचा वापर करून समाजोपयोगी कामे कशी तडीस न्यावीत हे श्री. धोंडगे यांनी दाखवून दिले आहे. श्री. धोंडगे जसे राजकारणी व समाजकारणी आहेत तसे ते पत्रकार व साहित्यिकही आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, लोहा तालुक्याच्या सीमेवर त्यांनी गुराखीगडाची निर्मिती केली. सन १९९१ पासून येथे दरवर्षी जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरविले जाते. श्री. धोंडगे यांनी विपुल लेखन केले आहे. ‘जय क्रांती या साप्ताहिकाचे ते संपादक राहिले असून त्यांनी आजतागायत सुमारे ३० पुस्तकाचे लेखन केले आहे.

‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कार’, ‘धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार’, ‘मराठवाडा रत्न पुरस्कार’, ‘भारतीय विकास रत्न अॅवॉर्ड’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘श्री शिवाजी लोक विद्यापीठ, कल्याण यांनी त्यांना मानद डि. लीट. पदवी प्रदान करुन सन्मानित केले आहे, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले.

०००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/o39gkrd
https://ift.tt/JfVRz8C

No comments:

Post a Comment