‘इज ॲाफ डुईंग बिजनेस’ च्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींसाठी व्यवस्था निर्माण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - latur saptrang

Breaking

Wednesday, August 31, 2022

‘इज ॲाफ डुईंग बिजनेस’ च्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींसाठी व्यवस्था निर्माण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३० :  ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’च्या माध्यमातून चित्रपट निर्मितीसह मनोरंजन क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींसाठी व्यवस्था निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बॅालिवूडचा नामांकित ६७ वा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळा वांद्रे येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधार मुनगंटीवार, अमृता फडणवीस यांच्यासह सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार, रसिकप्रेक्षक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी बरोबर मनोरंजनाची राजधानी म्हणून ओळखली जात आहे. याचा अभिमान आहे. जगभरात हिंदी चित्रपटसृष्टीचे नावलौकीक आहे. मात्र, आता मराठी, तेलगु, तमिळ अशा देशांतल्या विविध रिजनल चित्रपटसृष्टीदेखील मोठ्याप्रमाणात यश प्राप्त करीत आहेत. मनोरंजन क्षेत्र बदलत्या नव्या युगातून पुढे जात आहे. हा क्षेत्र कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती करणारे देखील क्षेत्र आहे. ‘इज ॲाफ डुईंग बिजनेस’ च्या माध्यमातून चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींची व्यवस्था निर्माण करण्यावर भर देणार. नवीन सरकार सर्वसामांन्याबरोबर  चित्रपटसृष्टीचे देखील आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील घडामोडींवर चित्रपट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील हिंदी चित्रपटसृष्टीचे आकर्षण आहे. त्यांनी नुकताच ‘धर्मवीर’ हा चित्रपट निर्मित केला होता जो हिट झाला. राज्यात गेल्या काही महिन्यात घडलेल्या राजकीय घडामोडींवर नक्कीच कोणीतरी चित्रपट बनवेल किंवा वेब सिरिज तर नक्की बनवतील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदान विशद करून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात कर प्राप्ती होते. या क्षेत्राला  चांगल्या सुविधा देण्यासाठी आगामी काळात सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. मुंबईत असलेली चित्रपट नगरी येत्या काळात अधिक प्रगती करेल. देशात जीएसटी कायदा अस्तित्वात आल्यापासून चित्रनगरीच्या माध्यमातून देशाला आणि राज्याला मोठ्या प्रमाणात जीएसटी कर प्राप्त झाला. आगामी काळात देशाच्या आणि राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या चित्रनगरीच्या व्यवसायात मोठी वाढ होईल. चित्रपट निर्मितीसाठी अनेकवेळा परदेशात जावे लागते, अशा चित्रपटांची निर्मिती देशात आणि महाराष्ट्रात होईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बॅालिवूड चित्रपट जगतात आपल्या कामातून ठसा उमटवणारे चित्रपट दिग्दर्शक व निर्माते सुभाष घई यांना ‘फिल्मफेअर’चा जीवनगौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस उपस्थित होत्या.

०००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/u9c3YZB
https://ift.tt/CknTM7W

No comments:

Post a Comment