चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवून जनतेला दिलासा द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - latur saptrang

Breaking

Sunday, August 28, 2022

चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवून जनतेला दिलासा द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि.२८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी  तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी वाहतूक कोंडी टाळण्याच्या उपाययोजनेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाहतुकीचे नियोजन करताना जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात यावे. चौकातील पूल पाडल्यानंतर सर्व्हिस रोड तातडीने तयार करावा. गर्दीच्या वेळी शहरात येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक योग्यरितीने नियंत्रित करावी. वाहतूक नियोजनाच्यादृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार तातडीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी शहरातील रिंगरोडच्या नियोजनाविषयी माहिती घेतली. लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल

मुख्यमंत्री साताऱ्याकडे जात असताना नागरिकांनी चांदणी चौक परिसरातील वाहतुकीची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. श्री.शिंदे यांनी तातडीने या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांना या भागाला भेट देऊन आवश्यक कामे तातडीने करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले होते.

आज मुंबईकडे परत जात असताना प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या परिसराला भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून  नियोजनाची माहिती घेतली. नागरिकांना होणारा त्रास लवकर दूर करण्यासाठी सर्व यंत्रणा एकत्रितपणे काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको’ हे त्यांचे वाक्य आणि आज दिलेली भेट नक्कीच जनतेला दिलासा देणारी आहे.

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/usrk4D5
https://ift.tt/4TmKjWf

No comments:

Post a Comment