विधानसभा लक्षवेधी - latur saptrang

Breaking

Tuesday, August 23, 2022

विधानसभा लक्षवेधी

मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रिटचे करणार-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती

 

मुंबई दि. २३ : मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांचे टप्प्या टप्प्याने काँक्रीटीकरण करणार अशी माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले कीमुंबई शहरातील रस्त्यांवर दर पावसाळ्यात खड्डे पडतात. त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. हा त्रास कमी व्हावा यासाठी शहरातील रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नुकतीच मुंबई महापालिकेचे आयुक्तविविध अधिकारी आणि तज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर मुंबईतील रस्ते काँक्रीटचे करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची आवश्यक ती तांत्रिक प्रक्रिया आणि कार्यवाही पूर्ण केली जात आहे. हे काम विहीत काळात पूर्ण केले जाईल याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई शहरातील मागाठाणे ते गोरेगाव पूर्व येथील साईबाबा संकुलपर्यंतचा रस्ता प्रकल्पाचा विशेष पायाभूत सुविधा प्रकल्पात समावेश केला जाईलअसेही त्यांनी स्पष्ट केले. या रस्त्यावरील काही ठिकाणी झोपडपट्टी आहे. तिथे व्यावसायिक उपक्रम चालवले जातात. त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातील. त्याचबरोबर याबाबत तेथील स्थानिक लोकप्रतिनिधीअधिकारी आणि तज्ज्ञ व्यक्ती यांची एक समितीही नियुक्त करण्याबाबत विचार केला जाईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मागाठाणे ते गोरेगाव पूर्व येथील साईबाबा संकुलपर्यंतचा रस्ता प्रकल्पाची लांबी ५.२ किलोमीटर आहे, पैकी मागाठाणे ते सिध्दार्थ नगर दरम्यान भूसंपादन कार्यवाही सुरू आहे. सिध्दार्थ नगर ते लोखंडवाला संकुल दरम्यानच्या सिध्दार्थ नगर ते एसीपी कार्यालयापर्यंतचा रस्ता विकसित करण्यात आला आहे. पुढील भागात झोपडपट्टी आहे. सदरच्या झोपडपट्टी धारकांची त्याच परिसरात पुनर्वसन करण्याची मागणी आहे. त्यामुळे निष्कासन कारवाई प्रलंबित आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी एकत्रित चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईलअसे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

यावरील चर्चेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सवश्री सुनील प्रभूपराग अळवणी यांनी सहभाग घेतला.

 

०००

आदिवासी भागातील रस्ते विकासासाठी प्राधान्याने काम केले जाईल

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची माहिती

आदिवासी पाडे आणि वस्त्या वाड्या मुख्य शहरांशी जोडण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल, असे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य प्रताप सरनाईक, दौलत दरोडा यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितले की, आदिवासी पाडे, वस्ती यांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण विकास, शालेय शिक्षण आणि वन विभाग या सर्वांत एकत्रित समन्वय साधला जाईल, असेही त्यांनी सांगितले. जलजीवन मिशन अंतर्गत सर्व आदिवासी पाडे आणि वस्त्या वाड्या येथे पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

याबाबतच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले, योगेश सागर आदी सहभागी झाले होते.

000

अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी सकारात्मक मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

मुंबई,  दि.  २३ :  अकोला येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन केले जाईल. त्यासाठी निधीची तरतूद केली जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य रणधीर सावरकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, अकोला विमानतळ विस्तारीकरणाबाबत राज्य शासन आवश्यक असणारी कार्यवाही करण्यास सकारात्मक आहे. विमानतळाच्या विकासाबरोबरच उडाण योजनेत समावेश करावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

000

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार –

पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

मुंबई, दि. २३ : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. श्री. विखे पाटील यांनी सांगितले की, राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. आढावा घेतल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगामार्फत पदे भरली जाणार आहेत. पशुधन पर्यवेक्षक पद प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावरील आहे. त्यामुळे या पदावर प्राधान्याने भरती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/cUmBz1b
https://ift.tt/HUDg1YZ

No comments:

Post a Comment