नवी दिल्ली, ६: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये विविध ४२ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पुढील वर्षाच्या १५ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात आयोजित ‘आजादी का अमृत महोत्सव’ राष्ट्रीय समितीच्या तिसऱ्या बैठकीत मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. या बैठकीस राष्ट्रीय समितीचे सदस्य, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, देशातील सर्व राज्यांचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी उपस्थित होते. महाराष्ट्राच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीस उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मागील वर्षी मार्च महिन्यात मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानाहून राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाच्या ग्रामीण विभागाच्या माध्यमातून ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती अपलोड करण्यात येत आहे व देशात सर्वाधिक कार्यक्रमांचे आयोजन करून महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळविले आहे. या कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी २५ डिसेंबर रोजी ‘नदी उत्सव’ साजरा झाला तसेच राज्य शासनाने या कार्यक्रमाची माहिती व प्रसिद्धी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी mahaamrut.org हे संकेतस्थळ तयार केले असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. राज्य शासनाच्या विविध विभागांद्वारे आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांविषयीही त्यांनी यावेळी माहिती दिली.
‘घरोघरी तिरंगा’ आणि ‘स्वराज्य महोत्सवा’च्या आयोजनासाठी यंत्रणा सज्ज
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ कार्यक्रम आणि ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या स्वराज्य महोत्सवासाठी राज्य शासनाच्या यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी श्री. शिंदे यांनी सांगितले. राज्यातील दोन कोटी घरांवर तिरंगा झेंडा फडकविण्याची योजना आहे. यासाठी खाजगी व्यापारी, अन्य संस्था आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून १ कोटी झेंडे उपलब्ध होणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण विकास विभागासाठी अपर मुख्य सचिव आणि नगर विकास विभागासाठी प्रधान सचिवांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांकडून या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वेळोवेळी आढावा बैठकाही घेण्यात येत असल्याचे श्री .शिंदे यांनी सांगितले. या अभियानांतर्गंत विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ३५.४५ कोटींचा निधी जिल्हा स्तरावर वितरीत करण्यात आला आहे.
स्वराज्य महोत्सवांतर्गंत राज्य, जिल्हा,तालुका आणि ग्राम व वार्ड स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखण्यात आली आहे. ग्रामस्तरावर आणि वॉर्ड स्तरावर विशेष सभांचे आयोजन, शाळा महाविद्यालये ,अंगणवाड्या, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक आदिंच्या सहकार्याने हा कार्यक्रम राज्यात राबविण्यात येणार असल्याचेही श्री .शिंदे यांनी सांगितले.
राज्यात अभिनव कार्यक्रमांचे आयोजन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हे आयोजन केवळ सरकारी न ठेवता त्यात लोकांचा अधिकाधिक सहभाग कसा ठेवता येईल, यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. या अमृत महोत्सवी आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत संपूर्ण कार्यक्रमांचा आढावा आम्ही घेतला असून, राज्यात जे काही अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहेत, त्याचीही माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिली. आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत 22 राज्यांच्या कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
00000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/NECHsmk
https://ift.tt/b45asHc
No comments:
Post a Comment