'दसरा मेळावा आता कोण कुठला बाटग्यांचा शिंदे गट घेणार'; सामनातून हल्लाबोल
"दसरा मेळावा हा महाराष्ट्राची जनता जागती आहे हे देशाला दाखवणारा सोहळा असतो, पण हा दसरा मेळावा आता कोण कुठला बाटग्यांचा शिंदे गट घेणार. तर शिवसेनेवर दसरा मेळावा कुणी घ्यायचा हे मुख्यमंत्री ठरवतील असं कमळाबाई मानभावीपणे सांगते. अरे सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचं सीमोल्लंघन करत आली आहे." अशा शब्दांत परखड टीका शिवसेनचा अग्रलेख सामन्यातून शिंदे गट आणि भाजपवर करण्यात आली आहे. दसरा मेळ्याव्याच्या परवानगीवरून वाद आता शिगेला गेल्यामुळे सामन्यातून शिंदेंना निशाणा केलं जातंय.
दसरा मेळावा हे बेईमानांचा, 'सुरती' बाजारबुणग्यांचा मेळा नसतो. तो अस्सल ज्वलंत मराठी हिंदुत्व अभिमान्यांचा उसळता जनसागर. दसरा मेळाव्याचे शिवतीर्थाशी एक नाते आहे. हे नाते तोडणाऱ्यांच्या ५६ पिढ्या खाली उतरल्या तरी त्यांना ते शक्य नाही होणार. इतिहासात असे अनेक तोतये निर्माण झाले आणि गांडुळाप्रमाणे नष्ट झाले. तुम्ही न्याय विकत घ्याल पण जनमताचा उसळता सागर, जो शिवतीर्थावर लोटत असतो तो सागर कसा विकत घेणार? असा खोचक सवाल शिवसेनेने शिंदे गट आणि भाजपला केला आहे.
"फोडा-झोडा-मजा बघा.. हेच तर भाजपचे मिशन होते. भाजपला शिवतीर्थावरच मराठी लोकांच दोन तट पडून मराठी रक्त सांडावे असं वाटतं. ज्या शिवतीर्थावरून संयुक्त महाराष्ट्राच्या विराट सभेतून एकजुटीचे दर्शन घडले, जिथे सेनेच्या विजयाची ललकारी घुमली, जिथे मराठ्यांच्या एकजुटी वज्रमुठी आवळल्या हेच भाजपचे मिशन मुंबई आहे." असा आरोप भाजपवर करण्यात आला आहे.
दरम्यान, शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने परवानगी मागितली होती. त्यानंतर शिंदे गटाने दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मागितली असून अजून कुणालाच परवानगी मिळाली नाही. त्यामुळे आता शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे लक्ष लागलेले आहे.
No comments:
Post a Comment