गावांमध्ये स्वच्छतेच्या सातत्यासाठी सरपंचांनी जनजागृती करावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील - latur saptrang

Breaking

Thursday, September 29, 2022

गावांमध्ये स्वच्छतेच्या सातत्यासाठी सरपंचांनी जनजागृती करावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. 29 : गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे, ग्रामस्थांचे आरोग्य सुधारावे यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचे महत्त्व समजणे आवश्यक आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घेतल्यास गावाचा विकास अधिक गतिमान होऊ शकतो, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

दि.१५ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचे आयोजन केंद्र व राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या अभियानात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली “स्वच्छता के लिए एकजूट भारत’ मोहिमेअंतर्गत सरपंच संवादाचे ऑनलाईन प्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यातील प्रत्येक तालुका पंचायत समिती कार्यालयातून संबधित तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायत समितीचे पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री.पाटील म्हणाले, “स्वच्छता ही सेवा” या उपक्रमांतर्गत गावागावांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यात यावी. गावातील कचराकुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई, कचरा स्त्रोतांच्या ठिकाणी सुका व ओला कचरा वेगळा करण्यासाठी जनजागृती उपक्रम, श्रमदान यासारखे उपक्रम घ्यावेत. कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्राची निर्मिती, प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन, एकल प्लास्टिक वापराच्या (SUP) दुष्परिणामांबद्दल सभेचे आयोजन करावे. पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण करणे, यासारखे विविध उपक्रम सरपंचानी आयोजित करावेत, असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यासाठी प्रयत्न करून दि २ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वच्छतेची प्रतिज्ञा घ्यावी, दि २ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वच्छ भारत दिवस निमित्ताने ग्रामसभांचे आयोजन करुन हागणदारी मुक्त अधिक (ODF Plus) अंतर्गत विविध घटकांची कामे पूर्ण झालेल्या गावांचे ODF Plus अंतर्गत ठराव घ्यावेत, अशा सूचनाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी  दिल्या.

गतवर्षात केंद्र शासनाने निश्चित करून दिलेल्या विविध अभियान अंतर्गत देशस्तरावरील एक आणि पश्चिम विभागीय राज्यामध्ये विविध सहा पारितोषिके राज्याला प्राप्त झाली आहेत. तसेच स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) २०२१ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला पश्चिम विभागीय राज्यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. ही सर्व पारितोषिके सरपंचांनी स्वच्छता मोहिमेला दिलेल्या नेतृत्वामुळे असल्याचे नमूद करून मंत्री गुलाबराव पाटील यांनी  या सर्वांचे अभिनंदन केले.

सद्यस्थितीत राज्यात ३ हजार ८८६ गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF PLUS) म्हणून गावांनी ग्रामसभेमध्ये ठराव पारित करुन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीने जाहीर केली आहेत. यामध्ये २ हजार ९८० गावे थ्री स्टार (मॉडेल) या प्रवर्गामध्ये जाहीर केली आहेत. त्याबदल मंत्री श्री. पाटील यांनी सरपंचांचे अभिनंदन केले.

सरपंच संवादामध्ये औरंगाबाद, नांदगाव, रोहा, वाशीम, वाळवा, कोरेगाव, ब्रम्हपुरी या तालुक्यातील सरपंचांनी उपस्थित केलेल्या स्वच्छतेच्या व जल जीवन अभियानासंदर्भातील विविध मुद्यांवर मंत्री श्री. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत राज्यात झालेल्या प्रगतीची माहिती, सहसचिव तथा अभियान संचालक, अभय महाजन यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांनी केले.

—–०००—–

केशव करंदीकर/विसंअ/29.9.22



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/lOdEpuf
https://ift.tt/CWD7iuw

No comments:

Post a Comment