काय कारण आहे मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांची भेट नाकारण्यामागे? - latur saptrang

Breaking

Thursday, September 15, 2022

काय कारण आहे मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांची भेट नाकारण्यामागे?

 


काय कारण आहे मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांची भेट नाकारण्यामागे?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ( Eknath Shinde ) संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांची भेट टाळल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत संभाजीराजे छत्रपती हे मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्यासाठी गेले होते. पण जवळपास दीड तास थांबूनही संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नाही, असं बोललं जातंय. बराच वेळ थांबूनही मुख्यमंत्री शिंदेंची भेट न होऊ शकल्याने संभाजीराजे छत्रपती हे मंत्रालयातून तडकाफडकी निघून गेल्याची चर्चा आहे.

संभाजीराजे छत्रपती हे मराठा समाजाच्या प्रश्नांसंबंधी आज मंत्रालयात आले होते. त्यांच्यासोबत मराठा समाजाचे समन्वयक आणि समाजाचे प्रतिनिधीही होते. यावेळी संभाजीराजे हे सर्वप्रथम सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना भेटले. त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबतचा पाठपुरवा करत माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंना भेटण्यासाठी त्यांच्या दलनाकडे गेले.


मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी संभाजीराजे छत्रपती हे बराच काळ थांबले. संभाजीराजे छत्रपती हे दीड ते दोन तास मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबून होते. संभाजीराजेंनी यादरम्यान वारंवार निरोप दिला. तर मुख्यमंत्री शिंदे हे पक्ष प्रवेशासाठी आलेल्यांच्या भेटी घेत होते. तर संभाजीराजे हे ताटकळत उभे होते. जवळपास दोन तास थांबूनही भेट होत नसल्याचे पाहून संभाजीराजे छत्रपती हे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाजीराजे छत्रपतींची भेट टाळली, अशी जोरदार चर्चा आता सुरू आहे.

संभाजीराजे छत्रपती हे तडकाफडकी निघून गेल्यानंतर आता यावरून सारवासारव सुरू झाली आहे. संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ घेतली नव्हती. तसेच ते सचिवांना भेटायला आले होते. आणि मुख्यमंत्री शिंदेंची पूर्वनियोजित बैठक असल्याने त्यांना भेटता आले नाही, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं. तसंच मुख्यमंत्री आणि संभाजीराजे छत्रपती यांचं फोनवरून बोलणं झाल्याची माहितीही मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.

संभाजीराजेंनी ट्विटमधून दिली माहिती

मराठा समाजाचे विविध प्रश्न व मराठा उमेदवारांची नियुक्ती या विषयांच्या पाठपुराव्याकरिता आज मंत्रालय येथे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेतली. यावेळी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी माझ्यासोबत उपस्थित होते. या अडचणी ऐकून घेऊन त्यांची सोडवणूक व्हावी व प्रत्येक उमेदवारास त्याची हक्काची नोकरी मिळावी, यासाठी खात्यांतर्गत समन्वय साधण्याकरिता शासनाने स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा, अशी सूचना केली. या विषयांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी माझ्यासोबत स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी, धनंजय जाधव (पुणे), अंकुश कदम (नवी मुंबई), विनोद साबळे (रायगड), गंगाधर काळकुटे (बीड) आदी उपस्थित होते, अशी माहिती संभाजीराजे छत्रपतींनी ट्विट करून दिली आहे.



मराठा समाजातील गटाची संभाजीराजेंवर नाराजी

मराठा समाज आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी मुंबईत बैठक झाली होती. या बैठकीत संभाजीराजे छत्रपती यांनी इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बोलू दिले नाही, असा आरोप करण्यात आला होता. यामुळे मराठा समाजातील एक गट संभाजीराजे छत्रपतींवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या या बैठकीत संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची स्तुती केली होती. तर मराठा समाजातील एका गटाने संभाजीराजे छत्रपतींचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नसल्याचं म्हटलं होतं. यामुळे मोठा वादा निर्माण झाला होता.

No comments:

Post a Comment