मुंबई : निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला निवडणुकीसाठी 'मशाल' चिन्ह आणि पक्षाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव दिले. मशाल चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडून ( Uddhav Thackeray Group Of Shiv sena Questions EC ) राज्यात ठिकठिकाणी आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तसंच शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळाल्यावरून ठाकरे गटाने खिल्ली उडवली आहे. पण आता याच नावावरून ठाकरे गटाने आक्षेप घेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' ( Balasahebanchi Shiv sena ) हे नाव कसे काय दिले? असा सवाल करत ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शिंदे गटाला हवं ते सर्व कसं काय मिळतंय आणि त्यांचे अंदाज कसे काय खरे ठरत आहेत? असा सवाल शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी केला आहे.
एक गोष्ट स्पष्ट आहे. शिंदे गटाकडून गेल्या काही दिवसांत सतत वक्तव्य केली जात आहेत. आणि आता त्यांनी म्हटलं होतं, नेमकं तसंच घडतंय. त्यांना जे हवं होतं, तसंच त्यांना मिळालं आहे. शिंदे गटाकडून मांडण्यात येणार विचार आणि निवडणूक आयोगाकडून घेतले जाणारे निर्णय हे एकसारखेच आहेत. इतक्या मोठ्या आणि स्वायत्त संस्थेकडून अशी अपेक्षा नाही, असं म्हणत अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा दुरुपयोग होऊ नये यासाठी शिवसेनेने सर्व प्रथम निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आणि आता शिंदे गटाला नेमकं 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव दिलं गेलं आहे. यावर आमचा आक्षेप आहे. आता या प्रकरणी पुढे काय कायदेशीर पाऊल उचलता यासंदर्भात वकिलांशी चर्चा करू, असं अनिल देसाई म्हणाले.
दरम्यान, मातोश्रीवर मशाल घेऊन आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचे उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जोरदार स्वागत केले. मशिलीचं महत्त्व आणि तेज सर्वांनी समजून घ्या. ही मशाल अन्याय, गद्दारी जाळणारी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दुसरीकडे, शिंदे गटातील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालनंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळावं, यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहोत, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment