महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्यावतीने डॉ.अशोक पोद्दार विशेष पुरस्काराने सन्मानित
लातूर : लातूरचे ख्यातनाम अस्थिशल्य चिकित्सक तथा आरोग्य विषयक सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या डॉ.अशोक पोद्दार यांना गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या ३८ व्या परिषदेत विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनची ३८ वी वार्षिक परिषद नुकतीच गोव्याच्या ताज रिसॉर्टस अँड कॉन्व्हेंशन सेंटर येथे पार पडली. या परिषदेत लातूर येथील ख्यातनाम अस्थिशल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार यांना वर्ष २०२२ मध्ये व्यक्तीगत पातळीवर ऑर्थोपेडिकमध्ये अत्यंत उल्लेखनिय व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्द्ल त्यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी ऑल इंडिया ऑर्थोपेडिक असो.चे अध्यक्ष डॉ. सेन , सचिव डॉ.ठक्कर , महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असो.चे अध्यक्ष डॉ. वासुदेव गाडेगोने , उपाध्यक्ष, डॉ. शिंदे, सचिव डॉ. कर्णे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांनी डॉ.अशोक पोद्दार यांचे या पुरस्काराबद्दल स्वागत करून अभिनंदन केले आहे. डॉ. अशोक पोद्दार यांनी आतापर्यंत १३४ मोफत अस्थिरोग शिबिरांचे यशस्वीरित्या आयोजन केलेले आहे. रुग्णसेवेस कायम अग्रक्रम देणाऱ्या डॉ. अशोक पोद्दार यांना यापूर्वीही सन २०१५ , २०१६ , २०१८ , २०१९ मध्ये ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या वतीने पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एम्सच्या वतीने उत्कृष्ट आरोग्य सेवेबद्दल डॉ. पोद्दार याना सन्मानित करण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. पोद्दार यांना विविध संस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आलेले आहे. ते आशादीप सेवाभावी संस्थेचे संस्थापक आहेत. संघटना वृद्धीसाठी सातत्याने प्रयत्नरत असणारे तज्ज्ञ डॉक्टर म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे.
डॉ.अशोक पोद्दार हे केवळ आरोग्य क्षेत्रातच सेवारत आहेत,असे नसून आरोग्यसेवेसोबतच ते कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. मागच्या सलग २० वर्षांपासून ते आपल्या हॉस्पिटलच्या वतीने उन्हाळयात शुद्ध थंड पाण्याच्या जारच्या माध्यमातून पाणपोई चालवतात. कोरोनाच्या काळात त्यांनी पाणपोयीप्रमाणे नागरिकांसाठी मोफत सॅनिटायझर सेवा उपलब्ध करून दिली होती, हे याठिकाणी उल्लेखनिय आहे. अशी सेवा देणारे कदाचित डॉ. पोद्दार हे राज्यातील एकमेव डॉक्टर असावेत. एवढेच नाही तर कोरोनाच्या काळात आपले हॉस्पिटल एकही दिवस बंद न ठेवता ते कायम गरजू रुग्णांसाठी चालू ठेवण्याचे कामही त्यांनी केले. लातूर ऑर्थोपेडिक संघटनेच्या उभारणीतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अग्रवाल समाजभूषण पुरस्कारानेही डॉ. पोद्दार यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आरोग्य, समाजसेवा अशा विविध क्षेत्रात अव्वल क्रमांकाची सेवा देणाऱ्या डॉ. अशोक पोद्दार यांना महाराष्ट्र ऑर्थोपेडिक संघटनेच्या मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment