‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त आयोजित पुस्तक प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट - latur saptrang

Breaking

Friday, October 14, 2022

‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त आयोजित पुस्तक प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई, दि. 14 : वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस दि. 15 ऑक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आजपासून मंत्रालय प्रांगणात मराठी भाषा विभागातर्फे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने सर ज. जी. उपयोजित महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेतील  विजेत्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यात प्रथम क्रमांक सृष्टी चिद्रवार, द्वितीय क्रमांक रोहित कोकरे,  तृतीय क्रमांक सोनाली गाभा यांना प्राप्त झाला आहे.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी भाषा विभागाने घेतलेल्या बोधवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक चेतना पेरवी, द्वितीय क्रमांक वैष्णवी राणे तर तृतीय क्रमांक अपेक्षा सोनवणे यांनी पटकवला आहे. त्यांनाही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिकाची रक्कम प्रदान करण्यात आली.

वाचन प्रेरणा दिनाच्या पूर्व संध्येला आज दि. 14 ऑक्टोबर रोजी मंत्रालयीन विभाग व क्षेत्रिय कार्यालय अधिकारी, कर्मचारी यांचे अभिवाचन व काव्यवाचन होणार आहे.

माजी  राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी उद्या दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार आहे.

***

विसंअ/अर्चना शंभरकर/मराठी भाषा

 

 



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/9P3RAEY
https://ift.tt/o2vbEJQ

No comments:

Post a Comment