मीरा-भाईंदर शहराला मॉडेल शहर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - latur saptrang

Breaking

Tuesday, October 11, 2022

मीरा-भाईंदर शहराला मॉडेल शहर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. 11 (जिमाका) :-  मुंबई व ठाणे लगतचे शहर असलेले मीरा-भाईंदर हे शहर सर्व सोयीसुविधा युक्त मॉडेल शहर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. राज्य शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मीरा रोड (पूर्व ) महाजनवाडी येथे स्केटींग रिंगचे लोकार्पण, महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन, भाईंदर (प.) येथील चिमाजी अप्पा यांच्या पुतळ्याचे लोकार्पण, घोडबंदर येथील महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन, भाईंदर (पूर्व) येथील महाराणा प्रताप पुतळ्याचे व मिरारोड (पूर्व) येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी  राज्य आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, खासदार राजेंद्र गावित, आमदार   प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, पराग शहा, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर निर्मला सावळे, रवी व्यास, राजू भोईर, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने मीरा भाईंदर शहरात अत्याधुनिक नाट्यगृह उभारले आहे. राज्यासाठी आणि देशासाठी लता दीदींचे अमूल्य योगदान आहे. लता दिदींच्या नावामुळे नाट्यगृहाची उंची वाढली आहे. त्याचप्रमाणे शहरात उभारलेल्या महाराणा प्रताप व शूरवीर चिमाजी अप्पा यांच्या पुतळ्यांमुळे भावी पिढीला त्यांचा पराक्रम कळेल व प्रेरणा मिळून देशाभिमान जागृत होईल. मूलभूत सुविधांबरोबरच अशा प्रकारच्या वास्तू उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाची व प्रतिनिधींची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. मीरा-भाईंदर परिसरातील लहान मुलांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने केलेली कामे कौतुकास्पद आहेत.

बांधकाम टीडीआरमुळे चांगल्या वास्तू उभ्या राहत आहेत. मोठमोठे प्रकल्प बांधण्यासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध असेलच असे नाही. अशा मोठ्या प्रकल्पांची बांधकामे महापालिकेचा पैसा न वापरता बांधकाम टीडीआरमधून बांधल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

हे शासन लोकाभिमुख असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ मिळावा या दृष्टीने सदैव प्रयत्नशील आहे. शासनाने गेल्या शंभर दिवसात सामान्य माणसाच्या विकासासाठी व सामान्य माणसाच्या हिताचे सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी विकास कामे मार्गी लावणार आहोत. जनतेच्या विकासासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात येत आहेत.

आपण लोकांशी बांधील आहोत लोकांना न्याय दिला पाहिजे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, केंद्राच्या सहकार्यामुळे राज्यातील मोठमोठे प्रकल्प मार्गी लागत आहेत. जे प्रकल्प केंद्राला पाठवले जातात ते त्वरित मंजूर करून मिळत आहेत. नगरविकास विभागाच्या 16 हजार कोटींच्या निधीस केंद्राने मंजुरी दिली आहे.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहामुळे शहरातील सांस्कृतिक गरज भागणार आहे. आमदार गीता जैन म्हणाल्या की, मीरा भाईंदर शहरातील कलाप्रेमीं साठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मुंबईला जाणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जलमार्गाचा प्रकल्प आराखडा मंजूर करून केंद्राकडे पाठवावा. तसेच दहिसर चेक नाक्याची समस्या सोडवावी.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्केटिंग रिंगच्या उद्घाटनावेळी चिमुकल्यांनी स्केटिंग करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी मुख्यमंत्री यांनी या चिमुकल्यांसोबत छायाचित्र काढून त्यांचे कौतुक केले.

00000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/Vka2SRn
https://ift.tt/RPyJbku

No comments:

Post a Comment