लम्पी चर्मरोग : पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या सुधारित शिफारशींनुसार उपचार करावेत - latur saptrang

Breaking

Sunday, October 9, 2022

लम्पी चर्मरोग : पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या सुधारित शिफारशींनुसार उपचार करावेत

मुंबई, दि.9 : शासनाने खाजगी पशुवैद्यकांना लम्पी चर्मरोग आजाराच्या उपचारासाठी कोणतीही बंदी घातलेली नाही. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 5 ऑक्टोबर, 2022 रोजी दिलेल्या सुधारित शिफारशीनुसार उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

श्री सिंह म्हणाले, देशात लम्पीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणावर पशुधन दगावले आहे. राज्यात पशुधन वाचविण्यासाठी शासनाने तत्काळ लसीकरण आणि उपचार केले.  09 ऑक्टोबरपर्यंत 3 हजार 92 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. ही संख्या देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत कमी आहे. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. लम्पीचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास जनावरे दगावण्याची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश जनावरे उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. सर्व पशुपालकांनी लम्पीच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा.

राज्यात 09 ऑक्टोबर अखेर 32 जिल्ह्यांमधील 2 हजार 368 गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या गावांतील 74 हजार 329 बाधित पशुधनापैकी 41 हजार 614 जनावरे रोगमुक्त झाली आहेत. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 128.01 लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातून 120.39 लाख पशुधनाचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. अकोला, जळगाव, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 86.04% गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाल्याची माहिती श्री. सिंह यांनी दिली.

00000

श्री. राजू धोत्रे (विसअ)



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2GEf8jY
https://ift.tt/u2RWCtA

No comments:

Post a Comment