राज्यात सुमारे ८८.५४ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण – पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह - latur saptrang

Breaking

Tuesday, October 11, 2022

राज्यात सुमारे ८८.५४ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण – पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

मुंबई, दि. 11 : लम्पी चर्मरोग प्रतिबंधाकरिता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 140.97 लक्ष लस  उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 123.88 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले असून जळगांव, धुळे, अकोला,कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 88.54% गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिली.

श्री सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. 11 ऑक्टोबर 2022 अखेर 32 जिल्ह्यांमधील एकूण 2 हजार 445 गावांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 81 हजार 723 बाधित पशुधनापैकी एकूण 46 हजार 434 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.  उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत.

राज्यात  दि. 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत एकूण 4 हजार 62 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. या रोगाची लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच उपचार सुरू झाल्यास,  मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. तरी सर्व पशुपालकांनी लम्पी चर्म रोगाच्या संभाव्य  लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधाण्याचे आवाहन श्री सिंह यांनी केले.

लम्पी चर्म रोगाबाबत विभागाच्या काही सेवांची आवश्यकता वाटत असल्यास अथवा माहिती द्यायची असल्यास संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना/तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय / जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा  टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय  कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ वर तत्काळ संपर्क साधावा असे श्री सिंह यांनी सांगितले.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/jKMqHBb
https://ift.tt/Dj8o3XL

No comments:

Post a Comment