सामाजिक बांधिलकी व मानवता धर्म जपत दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहूया – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी - latur saptrang

Breaking

Saturday, November 5, 2022

सामाजिक बांधिलकी व मानवता धर्म जपत दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहूया – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई दि. 5: नूतन गुळगुळे फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग मुलांना आधार देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. हीच सामाजिक बांधिलकी व मानवता धर्म जपत आपण सर्व नागरिक दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहूया, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित सातव्या ‘ध्येयपूर्ती पुरस्कार’ कार्यक्रमांतर्गत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात  अतुलनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते. या सोहळ्यास ‘नानावटी मॅक्स हॉस्पिटल’चे ज्येष्ठ कर्करोग सर्जन डॉ.संजय दुधाट, एसबीआय जनरल इन्शुरन्सचे उप-व्यवस्थापकीय संचालक आनंद पेजावर, कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या संचालक आम्रपाली साळवे व नूतन गुळगुळे फाऊंडेशनच्या अध्यक्ष नूतन गुळगुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, समाजात अशा अनेक सेवाभावी संस्था समाजसेवचे काम करीत आहेत. त्या संस्थांना प्रेरणा देण्याचे काम नूतन गुळगुळे फाउंडेशन करीत आहे. आज कर्तृत्ववान दिव्यांगांच्या कार्याचा या संस्थेने गौरव केला ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी मी या संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. शासनाच्या वतीने दिव्यांगांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या सोहळ्यात एसबीआय जनरल तर्फे 30 लाख रूपयांचा तसेच कोचीन शिपयार्ड लिमिटेडतर्फे 50 लाख रूपयांचा धनादेश सीएसआर निधीतून नूतन फाउंडेशन संस्थेला देण्यात आला.

या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 15 दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/ad5Z6yk
https://ift.tt/4hbnOrC

No comments:

Post a Comment