मराठवाड्याचा 80 हजार कोटीचा अनुशेष भरून काढण्यासाठी तीव्र लढा उभारण्याची गरज - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर - latur saptrang

Breaking

Saturday, September 18, 2021

मराठवाड्याचा 80 हजार कोटीचा अनुशेष भरून काढण्यासाठी तीव्र लढा उभारण्याची गरज - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर




 लातूर दि.17/09/2021

15 ऑगस्ट 1947 भारत देश स्वतंत्र्य झाला. त्यानंतर तब्बल 1 वर्ष 1 महिना 1 दिवसाने मराठवाड्याला स्वतंत्र्य मिळाले. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात मराठवाड्याच्या विकासासाठी निधी देऊ या भागातील तरूणांना शासकीय नोकर्‍यामध्ये प्राधान्य देवू, असे आश्‍वासन दिले होते परंतु, त्या प्रमाणात मात्र मराठवाड्याचा विकास झालेला नाही. याचा दोष शासनाला देणे योग्य नाही.1983 मध्ये 840 कोटीचा बॅकलॉक होता. 1994 मध्ये 4 हजार कोटीवर गेला. आणि आज हा बॅकलॉक 80 हजार कोटीवर गेलेला आहे. परंतु मराठवाड्याच्या नेतृत्वाने तो बॅकलॉक भरून काढण्यासाठी कुठलाही प्रयत्न केलेला नाही.परिणामी मराठवाडा हा दुष्काळवाडा झालेला आहे. त्यामुळे आतातरी मराठवाड्याचा 80 हजार कोटीचा अनुशेष भरून काढण्याची गरज आहे. यासाठी मराठवाडा विकास मंडळाची स्थापना करून तीव्र लढा उभारणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन लातूरात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी जेएसपीएम शिक्षण संस्था संचलित अराईज इंटरनॅशनल स्कूल भोसरी व मराठवाडा मित्रमंडळ परिवार, पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्‍त विद्यमाने 74 व्या मराठवाडा मुक्‍तीदिन महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा-2021 व ध्वजारोहन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड,पुणेचे पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश व व्याख्याते म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल बसनीस हे उपस्थित होते. तसेच मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज डेक्‍कन,पुणेचे कार्याध्यक्ष डॉ.भाऊसाहेब जाधव, पिंपरी चिंचवड मनपाचे माजी गटनेते एकनाथदादा पवार, प्राचार्य खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्याहस्ते अरूण पवार यांना (वृक्षमित्र पुरस्कार),श्रीराम हांडीबाग(उद्योजक पुरस्कार), संजू राम माने(कोरोना योध्दा पुरस्कार), प्रा.डॉ.गजानन वाव्हळ(समाजप्रबोधनकार पुरस्कार), सुनिल जाधव(सामाजिक पुरस्कार), दत्तात्रय इंगळे (समाजसेवा पुरस्कार) आदींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंगोले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चौगुले यांनी केले. तर अभार प्राचार्य खैरनार यांनी मानले.
पंतप्रधान मोदींना जगाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळो
देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक विधायक निर्णय घेण्यात आले. त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळालेला आहे. 17 सप्टेंबर 2021 आज रोजी त्यांचा वाढदिवस आहेे. त्यामुळे यानिमित्ताने त्यांच्या हातून होत असलेल्या कामांना गती मिळून पुढील कालावधीतही पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाबरोबर जगाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळो, अशी अपेक्षाही माजी आ.कव्हेकर यांनी बोलताना व्यक्‍त केली.
स्वातंत्र्यसेनानींनी निजामाची जुलमी राजवट संपविली
यावेळी बोलताना पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वांतत्र्य झाला. त्यानंतर वर्षभरातच मराठवाडा निजामांच्या राजवटीतून मुक्‍त झाला. निजामशाहीची जुलमी राजवट सरदार वल्‍लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ अशा अनेक स्वांतत्र्यसेनानींनी अथक परिश्रमाने व बलीदानाने निजामशाही मोडून काढली त्यामुळे मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनाचा आपण आदर केला पाहिजे. व हा मराठवाडा मुक्‍तीदिन महोत्सव म्हणून साजरा करावा. असे आवाहनही पिंपरी चिंचवड येथील पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी केले.
मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज
यावेळी बोलाताना अखील भारतीय साहित्य संम्मेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस म्हणाले की, मराठवाडा हा खर्‍या अर्थाने तेव्हा मुक्‍त होईल जेव्हा या भागातील निरक्षरता, गरीबी, सामाजिक व पाण्याच्या विकासापासून आपणाला मुक्‍ती मिळेल. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व शिक्षीत वर्गाने संघटीत होवून मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यीक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.



No comments:

Post a Comment