अहमदनगर:संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे तेथे आढळून आलेल्या चिठ्ठीवरून दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यामध्ये कोणाचेही नाव अगर कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचेही सांगण्यात आले. (ST Bus Driver Suicide in Sangamner)
मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. संगमनेर स्थानकात पाथर्डी-नशिक (एम. एच. १४, बी. टी. ४८८७) ही बस उभी होती. त्यामध्ये तेलोरे यांचा गळफास लावून घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. बसचे वाहक पोपट साहेबा जावळे (पाथर्डी डेपो) यांनी पोलिसांना माहिती कळविली. पहाटे पाचच्या सुमारास तेलोरे आपल्या अन्य सहकाऱ्यांसह कामावर जाण्यासाठी तयार झाले. डेपोतून बाहेर पडताना ते पुढे निघाले. मी पुढे जातो, तुम्ही पाठीमागून या, असे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले. थोड्यावेळाने वाहक जावळे बसमध्ये आले. त्यावेळी चालक तेलोरे यांचा मृतदेह बसमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रवाशांना उभे राहताना पकडण्यासाठी बसच्या छताला जो बार लावलेला असतो, त्याला सुती दोरीच्या सहायाने तेलोरे यांनी गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी मिळाली आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख रुपयांचे कर्ज असल्याचा व त्याला कंटाळल्याचा उल्लेख आहे. मात्र, यामध्ये कोणालाही जबाबदार धरणारा नमोल्लेख पोलिसांना आढळून आला नाही. पोलिसांनी ही माहिती तेलोरे यांच्या कुटुंबियांना कळविली असून ते संगमनेरला निघाले आहेत. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. कुटुंबाकडे चौकशी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
No comments:
Post a Comment