ना ढोल-ताशा पथक, ना मिरवणूक; नाशिकमध्ये शांततेत गणरायाला निरोप - latur saptrang

Breaking

Sunday, September 19, 2021

ना ढोल-ताशा पथक, ना मिरवणूक; नाशिकमध्ये शांततेत गणरायाला निरोप



 नाशिकः 'हे विघ्नहर्त्या, सर्व दु:खाचे तू निवारण करून आम्हाला भयमुक्त जीवन दे. पुढच्या वर्षी मांगल्याच्या चिन्हांसह आम्हाला आशिर्वाद देण्यासाठी तू ये', अशा आशयाचे मागणे मागत भाविकांनी श्रीगणेशाच्या जयकारात गणरायाला भावूकतेने निरोप दिला. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर संमिश्र भावनांमध्ये अडकलेल्या भाविकांच्या आयुष्यात नवा आशावाद पेरत गणरायाच्या मूर्तीने पुन्हा एकदा भाविकांवर मायेची पखरण केली. शहरातील मूर्ती संकलन केंद्रांवर लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.


रविवारी सकाळपासूनच शहरातील वातावरण भक्तीमय बनले होते. श्रींच्या उत्तर पूजनासाठी घरांमध्ये व सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लगबग दिसून येत होती. यंदा थेट जलस्त्रोतांमध्ये श्रींच्या विसर्जनास परवानगी नसल्याने मूर्ती संकलन केंद्रांची भूमिका महत्त्वाची ठरली. विविध सामाजिक सेवा संस्था आणि महापालिकेच्या वतीने मूर्तींचे संकलन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. दुपारी बारा वाजेनंतर या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रामकुंड, गोदाकाठ परिसर, सोमेश्वर धबधबा परिसर, बापू पूल आदी परिसरात मूर्ती संकलन केंद्रांसोबतच कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. निर्माल्य विसर्जनासाठीही पालिका व सामाजिक संस्थांनी स्वतंत्र व्यवस्था केली होती. बहुतांश भाविकांनी घरातच कुंड साकारत मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन केला.
यंदा विसर्जनस्थळांभोवती नेहमी जाणवणारा गोंगाट, बँझोचे मोठे आवाज, विसर्जनासाठी उसळणारी गर्दी असे प्रकार आढळले नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिस व संबंधित यंत्रणांनी केलेल्या आवाहनाला नाशिककरही चांगला प्रतिसाद देत असल्याचे चित्र जागोजागी बघण्यास मिळाले. महापालिकेच्या वतीने मूर्त विसर्जनासाठी ‘टँक ऑन व्हील’ ही संकल्पनाही विविध भागांमध्ये राबविण्यात आली. विविध सोसायट्यांमधील सदस्यांनी एकत्रित येत विसर्जन केंद्रांवर मूर्ती दान केल्या. बहुतांश नागरीकांनी मास्क, सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन केले असले तरीही काही तुरळक ठिकाणी या नियमांना छेद देणारे भाविकही दृष्टीस पडले.

घरगुती विसर्जनावर भर

यंदा तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू करण्यात आलेली कडक नियमावली, हाती उरलेला केवळ मूर्ती दान करण्याचा पर्याय यामुळे नागरीकांनी घरगुती विसर्जनावर भर दिला. यासाठी घरांमध्ये किंवा सोसायट्यांच्या प्रांगणात पुष्पांनी सजविलेले कुंड साकारण्यात आले होते. सर्व आप्तेष्टांनी एकत्रित येत विधिवत पूजन करून श्रींनी भावूकतेने निरोप दिल्याने शहरातील गर्दीवरदेखील काही प्रमाणात नियंत्रण आले.
विसर्जनस्थळी मोजकीच माणसे

पारंपरिक पध्दतीने विसर्जन करताना पूर्ण कुटुंब किंवा आप्तेष्ट मिळेल त्या वाहनाचा उपयोग करून दरवर्षी विसर्जनस्थळी हजर होतात. पण यंदा मूर्ती दानाचा पर्याय हाती असल्याने भाविकांनी कुटुंबातील एक किंवा दोन प्रतिनिधींच्या उपस्थितीत मूर्त दान केली.

No comments:

Post a Comment