नवी दिल्लीः पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण ( punjab new chief minister ) असतील? यावर सस्पेन्स कायम आहे. अमरिंदर सिंग यांच्या जागी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या अंबिका सोनी ( ambika soni ) यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर सोनिया गांधी ( sonia gandhi ) यांनी दिल्याचं सांगण्यात येतंय. पण अंबिका सोनी यांनी नकार दिल्याने आज होणारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या, हरीश रावत, अजय माकन आणि नवज्योतसिंग सिद्धू हॉटेलमध्येच मुख्यमंत्र्यांच्या नवीन नावांवर विचारमंथन करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत चार नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय सुनील जाखड या शर्यतीत आघाडीवर आहेत. याशिवाय नवज्योतसिंग सिद्धू, प्रताप बाजवा आणि सुखजिंदर सिंग रंधावा यांचेही नाव या शर्यतीत आहेत.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशिवाय विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून, पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड़, माजी मंत्री सुखजिंदर सिंग रंधावा, तृप्त राजिंदर सिंह बाजवा आणि राज्यसभा सदस्य प्रताप सिंह बाजवा यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी, ब्रह्म मोहिंद्रा, विजय इंदर सिंगला, पंजाब काँग्रेसचे कार्यकारीध्यक्ष कुलजीत सिंह नागरा यांची नावंही चर्चेत आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.
काँग्रेस हायकमांडने सिद्धू यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासोबत हिंदू आणि दलित समाजातील दोन उपमुख्यमंत्री किंवा या समाजातील एक नेता उपमुख्यमंत्री आणि दुसऱ्या समाजाच्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष केले जाऊ शकते, माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वी काँग्रेसच्या ५० हून अधिक आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली होती. या पत्रानंतर काँग्रेस हायकमांडने विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. राजीनामा देण्यापूर्वी अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या निवासस्थानी आमदार समर्थकांची बैठक घेतली होती.
No comments:
Post a Comment