सहकारमहर्षी, तात्‍याबद्दल आदर आहे तर त्‍यांचे स्‍मारक उभा करण्‍यात काय अडचण आ. रमेशअप्‍पा कराड यांचा सवाल - latur saptrang

Breaking

Monday, September 27, 2021

सहकारमहर्षी, तात्‍याबद्दल आदर आहे तर त्‍यांचे स्‍मारक उभा करण्‍यात काय अडचण आ. रमेशअप्‍पा कराड यांचा सवाल



           मांजरा साखर कारखान्याची उभारणी स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि स्वर्गीय बब्रुवानजी काळे तात्या या दोघांनीच केली जर तात्या बद्दल तुम्हाला आदर आहे तर पंधरा वर्ष कारखान्याचे चेअरमनपदी राहून माजंराला वैभव प्राप्त करून देणाऱ्या तात्यांचे स्मारक उभा करण्यात अडचण काय आणि टाळाटाळ कशासाठी केली जाते असा प्रश्न मांजरा कारखान्‍याचे सभासद भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी उपस्थित केला आहे.

          विलासरावजी देशमुख यांचे सभासद शेतकऱ्यांच्या पैशातून कोट्यावधी रुपये खर्च करून कारखानाच्या परिसरात अत्यंत देखणे स्मारक उभे केले. विलासरावजी यांच्या अगोदर तात्यांचे निधन झाले. मांजरा साखर कारखान्याच्‍या चेअरमनपदी पंधरा वर्षे राहून तात्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कारखाना चालविला. गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली त्यामुळे त्यांचे माजंरा कारखाना परिसरात स्मारक उभे राहिले पाहिजे ही शेतकरी सभासदांची मागणी अनेक दिवसापासून आहे. मात्र तात्यांचे स्मारकच काय तर नाव सुद्धा कारखाना परिसरात राहू नये अशा नियोजन पद्धतीने दक्षता घेतली जात असल्याची खंत आ. रमेशआप्पा कराड यांनी व्यक्त केली

       मांजरा कारखान्‍याच्‍या ऊभारणीत सिंहाचा वाटा असणारे स्व. बाबुरावजी काळे तात्या यांचे कारखाना परिसरात स्मारक व्हावे या बाबत आ. रमेशआप्पा कराड यांनी वारंवार लेखी कळविले. मांजरा साखर कारखान्याची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ऑनलाइन झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी बब्रुवानजी काळे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे यात विरोधक राजकारण आणत आहेत. मांजरा परिवार राजकीय दबावला घाबरत नाही, वेळ पडली तर जशास तसे उत्तर देऊ असे बोलून दाखवले होते. त्यावर बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, कारखाना ही काही कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही. शेतकरी सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे. विलासरावजी आणि काळे तात्‍या यांनी कारखान्याची उभारणी केली त्यावेळी आपण कुठे होता, कोणी कष्ट घेतले, कोणी मेहनत घेतली आपणास काय माहित आहे ?

          लोकशाही सनदशीर मार्गाने न्याय मागितला तर आडवा आणि जिरवाची भूमिका घेणारे खरंच सहकार महर्षी आहेत का?  विरोधकाच्या दबावाला घाबरत नाही वेळ पडली तर जशास तसे उत्तर देऊ ही भाषा सहकार महर्षीला शोभत नाही. जर आपल्याला तात्या बद्दल आदर आहे तर आज पर्यंत तात्यांचे स्मारक का उभे केले नाही याचा अगोदर खुलासा करावा असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, स्वर्गीय काळे तात्या यांचे स्मारक करण्यात आम्ही राजकारण करत नाहीत असे यापूर्वीच जाहीर केले आहे. राजकारण करायला ही काही निवडणूक नाही. हा शेतकऱ्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मांजरा कारखान्याच्या परीसरात तात्यांचे स्मारक व्हावे ही शेतकऱ्याची भावना आहे

        मांजरा परिवार जर शेतकऱ्याचे हित जोपासत असेल तर मांजरा परिवारातील शेतकरी सभासदांना एफआरपीप्रमाणे गाळप केलेल्या ऊसाला भाव का दिला जात नाही ?  रिकव्हरी प्रमाणे उसाचा दर काय निघतो ? हे आजपर्यंत का जाहीर केले नाही ? किती दिवस शेतकऱ्यांना वेड्यात काढणार. आता कुणी आडानी राहिला नाही. स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या मुलांना जगात कुठे काय घडतय आणि काय चाललंय हे आता कळतंय.

         विरोधकांनी तात्यांना निवडून येऊ दिले नाही हा सहकार महर्षीने स्वतःवरच केलेला आरोप असून जिल्हा परिषद आणि मांजरा कारखाना निवडणुकीत तात्यांच्या पराभवासाठी काय काय करामती केल्या हे जनतेला माहित आहे. पराभवासाठी सहकार महर्षीने कोणा कोणाला रसद पुरविली हे अनेकांना ज्ञात आहे न समजण्या इतकी दूध खुळी जनता नाही. मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत एका तात्यांना पाडून दुसऱ्या तात्‍यांना कोणी निवडून आणले हे जनता विसरली नाही असेही आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.

        शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एफआरपी प्रमाणे उसाला भाव मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही संघर्ष केला. शासनाच्या नियमानुसार उसाला एफआरपीप्रमाणे भाव का दिला नाही, जाहीर का केला नाही हे अगोदर सांगावे असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, बब्रुवान काळे तात्या यांचे स्मारक उभे करण्यात होणारी  जाणीवपूर्वक टाळाटाळ शेतकरी कदापी खपवून घेणार नाहीत. तात्यांचा पुतळा उभा करून सहकारातले राजकारण थांबवावे. कारखान्याने तात्याचे स्मारक उभे नाही केले तर शेतकरी पई पई गोळा करून स्मारक उभे केल्याशिवाय राहणार नाहीत असेही त्यांनी बोलून दाखवले.

No comments:

Post a Comment