मुंबई, दि.२७ : ‘समाज भूषण’ या देवेंद्र भूजबळ यांनी संपादीत केलेल्या पुस्तकातील व्यक्तींच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. स्वयंप्रेरणेने आणि समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या लोकांना सर्वांसमोर आणण्याचे काम या पुस्तकाने केले आहे, असे उद्गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज काढले.
भरारी प्रकाशनातर्फे प्रकाशित माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक देवेंद्र भूजबळ यांनी लेखण आणि संपादन केलेल्या ‘समाज भुषण’ या पुस्तकाचे आज मंत्रालयात मराठी भाषा मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संचालक गणेश रामदासी, दयानंद कांबळे, उपसंचालक गोविंद अहंकारी, देवेंद्र भूजबळ, श्रीमती अलका भुजबळ यांच्यासह भरारी प्रकाशनच्या श्रीमती लता गुठे उपस्थित होत्या.
श्री. देसाई पुढे म्हणाले, प्रत्येक समाजातील घटक मिळून भारतीय समाज व्यवस्था तयार झाली आहे. यात प्रत्येकाचं काम ठरलेले असायचे. कासार समाजातील लोकांनी पुर्वापार बांगड्या भरण्याचा व्यवसाय केला आहे. या समाजाची मुळ प्रवृत्ती उद्योजकाची आहे. आज या समाजातील अनेक लोक समर्पित भावनेने कार्य करत विविध क्षेत्रात नावारुपाला आली आहेत. अशा लोकांचा आदर्श समाजापुढे आणण्याचे काम या पुस्तकाच्या निमित्ताने झाले आहे. अशा अनेक व्यक्ती अजुनही प्रकाशात आल्या नसतील तरी त्यांच्या कार्याचा उल्लेख असलेले पुस्तकांचे अनेक खंड प्रकाशित व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करुन पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल लेखकाचे आणि प्रकाशकांचे श्री. देसाई यांनी अभिनंदन केले.
यावेळी बोलताना डॉ. पांढरपट्टे म्हणाले, कासार समाजातील व्यक्तींनी प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. या सर्वांची प्रातिनिधिक माहिती समाज भूषण या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या हाती आली आहे. श्रीमती अलका भुजबळ यांनी कॅन्सरसारख्या आजारावर मात केली, श्री.भुजबळ यांनी हालाखीच्या परिस्थीतून वर येत संचालक पदापर्यंत काम केले आहे. ते नोकरीतून निवृत्त झाले असले तरी त्यांनी लेखन सेवा सुरु ठेवली आहे याचा उल्लेख करुन पुस्तक प्रकाशनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
निवृत्त झाल्यानंतरही सतत चिंतन मनन आणि लेखन करणारे, माजी संचालक श्री.भुजबळ यांच्या कामातून प्रेरणा मिळत असते असे सांगून संचालक श्री. रामदासी यांनी पुस्तक प्रकाशनाला शुभेच्छा दिल्या. लातूर पासून ते मलेशियापर्यंतच्या कर्तुत्वान लोकांना या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणण्याचे काम समाज भुषण या पुस्तकाच्या माध्यमातून झाले आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा नातू यांनी केले तर आभार प्रकाशक लता गुठे यांनी व्यक्त केले.
भरारी प्रकाशनातर्फे प्रकाशित 35 यशकथांचा संग्रह असलेले समाज भुषण हे पुस्तक आज प्रकाशित झाले. कासार समाजातील बंधु भगिनींच्या यशकथांचे संकलन यात करण्यात आले आहे. सुहास भागवत यांचे मुखपृष्ठ असलेल्या या पुस्तकाची किंमत 200 रुपये आहे. भरारी प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे 200 वे पुस्तक आहे.
***
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3CMxysj
https://ift.tt/3ESA6XE
No comments:
Post a Comment