मांजरा काठी पूर परिस्थिती; धनंजय मुंडे घटनास्थळी, रात्रीतून वेगाने मदतकार्य झाल्याने जीवितहानी टळली
अंबाजोगाई, दि. 28 : “मी धनंजय बोलतोय, तुम्ही व्यवस्थित, सुरक्षित आहात ना? किती जण व कुठे अडकलेले आहात? बोट मदतीला आली आहे का? काळजी करू नका;” असे बोलून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांची विचारपूस केली.
देवळा ता.अंबाजोगाई येथील 51 जण मांजरा नदीच्या पुरात अडकले असून त्यापैकी 27 जणांना आतापर्यंत सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर उर्वरित नागरिकांना सुरक्षा रक्षक जवान बोटीने बाहेर काढत आहेत. मांजरा नदीच्या काठी पूर परिस्थितीने नुकसान झालेल्या गावांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची व नुकसानीची पाहणी केली व एन डी आर एफ सह अधिकाऱ्यांकडून बचाव कार्याची माहिती घेतली.
मागील 24 तासात जिल्ह्यात सर्वदूर तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाली असून बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांमध्ये घरात पाणी शिरले असून त्याठिकाणी नागरिकांना आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे.
सबंध रात्रभर आपण जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून दर तासाला जिल्ह्यातील एकूण उपाययोजनेची व उपलब्ध यंत्रणांची माहिती घेत आहे व एन डी आर एफ सह अन्य बचाव पथकांना आवश्यक सूचना देत आहोत; एन डी आर एफ, अग्निशमक सह पथके बचाव कार्यात तैनात आहेत, हेलिकॉप्टर सुविधेसाठी वातावरण पूरक नसले तरी त्याचीही तयारी करून ठेवलेली आहे, असे श्री.मुंडे म्हणाले.
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी पाठपुरावा करणार
काल रात्रीच या संपूर्ण परिस्थितीबाबत मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून त्यांना जिल्ह्यातील एकूण परिस्थितीची माहिती दिली आहे.
मागील पंधरवाड्यात तीनवेळा अतिवृष्टी झाली त्यामुळे शेती नुकसानीचे पंचनामे करताना आकडेवारी बदलत आहेत. मात्र, आता काही महसूल मंडळांमध्ये शेती मध्ये काहीच उरले नाही. अक्षरशः जमीन खरडून गेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे श्री.मुंडे म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, ज्येष्ठ नेते राजेश्वर आबा चव्हाण, दत्ता आबा पाटील, गोविंदराव देशमुख, ताराचंद शिंदे, तानाजी देशमुख, रणजित चाचा लोमटे, अजित गरड यांसह अधिकारी व बचाव पथकातील कर्मचारी उपस्थित होते.
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3ogn3JS
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment