निर्यात क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी वाणिज्य उत्सवाचे आयोजन - latur saptrang

Breaking

Monday, September 20, 2021

निर्यात क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी वाणिज्य उत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. 20 : निर्यात क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय ‘वाणिज्य उत्सव’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई येथील जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे उपस्थित राहणार आहेत.

“आजादी का अमृत महोत्सव”- 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत दि.20 ते 26 सप्टेंबर 2021 या कालावधीत “वाणिज्य सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील सुमारे 200 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. यात, उद्योजक, निर्यात प्रचालन परिषदांचे पदाधिकारी, निर्यातदार, विविध शासकीय विभागाचे अधिकारी यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग विभागाच्या संनियंत्रणाखाली DGFT या केंद्र शासनाच्या संस्थेच्या सहयोगाने व Gems and Jewellery Export Promotion Council (GJEPC) यांचे मार्फत करण्यात येत आहे.

कार्यक्रमांत राज्यातील निर्यात संधी, पायाभूत सुविधा, बॅंकींग आणि वित्तीय सहकार्य या शिवाय खाद्य, कापड, इंजिनिअरिंग, केमिकल आणि औषध निर्मिती, जेम्स ॲण्ड ज्वेलरी या विषयातील संधी याविषयावर चर्चासत्रे (Panel Discussion) तसेच प्रदर्शन दालनांमार्फत (Stalls) माहिती देण्यात येणार आहे.

***

अर्चना शंभरकर/विसंअ/उद्योग



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3lLceN3
https://ift.tt/39f9xgE

No comments:

Post a Comment