मुंबई, दि. 28 : बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना सामाजिक जबाबदारी म्हणून सध्या असलेल्या शाळांना त्यांच्या गरजेनुसार जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना खासदार शरद पवार यांनी केली.
वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात बाधित होत असलेल्या शाळांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुख्याधिकारी योगेश म्हसे आदी उपस्थित होते.
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात मुंबई महानगरपालिकेची शाळा तसेच मराठा मंदिर शाळा बाधित होत आहे. या शाळांना सामाजिक जबाबदारी म्हणून आवश्यक जागा उपलब्ध करून देणे, हीच शासनाचीही भूमिका आहे, त्यानुसार नियोजन करावे, असे निर्देश मंत्री श्री.आव्हाड आणि श्री.ठाकरे यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले. एसएससी सह सीबीएसई शाळा सुरू करण्यासाठी त्यांच्या अटी व शर्तीनुसार या शाळांचे बांधकाम करावे असे श्री.आव्हाड यांनी सांगितले तर ही इमारत बांधताना विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी खेळती हवा, पाणी, स्वछतागृहे, मातीचे मैदान या सुविधांचा विचार करावा, असे श्री.ठाकरे यांनी सांगितले. संपूर्ण परिसराला या शाळांचा उपयोग होणार असल्याने त्याचा दर्जा उत्कृष्ट असावा, असेही ते म्हणाले.
या बैठकीस म्हाडा, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
००००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3zYJYvv
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment