रेणापूर/प्रतिनिधी: तालुक्यातील मोटेगाव व परिसरातील गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी तक्रारी नोंदवाव्यात,असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी केले आहे.
मोटेगाव व वांगदरी परिसरात शासनाकडून नुकसानीची पाहणी केली जात आहे.या सज्जाचे तलाठी तिडके व कर्मचारी पाहणी करत आहेत.दाने यांनी यादरम्यान त्यांची भेट घेतली.अधिकाऱ्यांसोबत पाहणीही केली.
अनेक शेतकऱ्यांचा ऊस पावसामुळे आडवा झालेला आहे.कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही पाणी साठलेले असून जास्तीच्या पावसामुळे सोयाबीन पिवळे पडत आहे.मूग व उडीद ही पिके पूर्णपणे हातची गेली आहेत.पाहणी झाल्यानंतर हा अहवाल वरिष्ठांकडे दिला जाणार असल्याची माहिती तलाठी तिडके यांनी दिली.
तालुक्यातील सर्वांनाच सरसकट मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सचिन दाने यावेळी म्हणाले.यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी नोंदवाव्यात.ज्यांना ऑनलाइन तक्रार करणे जमत नाही त्यांनी नुकसानभरपाईसाठी ऑफलाईन अर्ज करावेत, असेही ते म्हणाले.
यावेळी मल्लिकार्जुनअप्पा हलकंचे,माऊली पवार,प्रसाद हलकंचे,शेतकरी मोहन पवार,तानाजी पवार,गणेश पवार,राजकुमार पवार, सर्जेराव सोमवंशी,विकास सोमवंशी,वांगदरीचे विकास मोकाशे यांच्या शेतात नुकसानीची पाहणी करण्यात आली.यावेळी बंटी मोटे, मनोरथ सोमवंशी,गणेश सोमवंशी,हणमंत पाटील यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
No comments:
Post a Comment