मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) सध्या वेगवेगळ्या खटल्यांमुळे चर्चेत आहे. प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगनाविरूध्द मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या सुनावणीस हजर न राहिल्यास अटक वॉरंट बजावण्याची तंबी न्यायालयाने कंगनाला दिली होती. यामुळे कंगना आज अखेर न्यायालयात हजर झाली. तिने आता खटला सुरू असलेल्या न्यायालयावर अविश्वास दाखवत दुसऱ्या न्यायालयात खटला वर्ग करण्याची मागणी केली आहे.
कंगनाने आज जावेद अख्तर यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. अख्तर यांच्याविरोधात खंडणी आणि धमक्या दिल्याचा आरोप तिने केला आहे. याचबरोबर अंधेरी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयावरील विश्वास उडाल्याचे तिने म्हटले आहे. हा खटला दुसऱ्या न्यायालयाकडे वर्ग करावा, अशी मागणी तिने केली आहे. आजच्या सुनावणीवेळी कंगना आणि जावेद अख्तर हे दोघेही न्यायालयात आमनेसामने आले. कंगनाचा खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग करावा, यावर 1 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
कंगनाविरोधात अटक वॉरंट काढण्याचा इशारा न्यायालयाने नुकताच दिला होता. मुंबईतील अंधेरी येथील महानगर न्यायादंडाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीवेळी कंगनाच्या वकिलांनी ती देशात नसल्याने सुनावणीला येणार नाही. त्यामुळं इथे उपस्थित राहण्यापासून सवलत मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी त्यावर आक्षेप घेतला होता.
कंगना एकाही तारखेला हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्याची मागणीही भारद्वाज यांनी केली होती. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश आर. आर. खान यांनी कंगनाला सुनावणीच्या दिवसापुरते हजर न राहण्याची सवलत दिली. पण पुढील तारखेला त्या हजर न झाल्यास जामीनपात्र वॉरंट काढले जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. यामुळे कंगना आज सुनावणीला हजर राहिली. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.अंधेरीतील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुरु केलेल्या अवमान खटल्याच्या कारवाईला कंगनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने योग्य प्रकारे हा निर्णय घेतला नाही, असा दावा कंगनाने केला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांनी 1 कंगनाची याचिका रद्दबातल ठरवली आहे.
काय आहे प्रकरण?
कंगनाने अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बॅालिवूडमधील सुसाईड गँगमध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले होते. तिच्या या आरोपांमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी केला होता. कंगनाची चौकशी करण्यासाठी पोलीस तिला वारंवार समन्स बजावत होते. परंतु. ती त्याला उत्तर देत नव्हती. या प्रकरणात कंगना एकदाही न्यायालयात सुनावणीला हजर राहिलेली नव्हती.
No comments:
Post a Comment