- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.30-09-2021
गुंठेवारी, दिडपाणी, सातपाणी एन.एन.असलेल्या प्लॉटधारकांची 12 जुलै 2021 रोजी काढलेल्या परिपत्रकामुळे रेखांकणाशिवाय रजिस्ट्री होत नाही. या त्यांच्या रजिस्ट्रीच्या परिपत्रकामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक व लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये सर्वाधिक 82 टक्क्यावर असलेल्या अल्पभूधारकांना सर्वाधिक त्रास होत आहे. त्यामुळे त्या अन्यायकारी परिपत्रकाबाबत राज्याचे महसूलमंत्री, राज्याचे सचिव यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेवू, असे मत माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी ते ब्रीज हॉटेल येथे समस्त लातूरकर संघर्ष समितीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी या पत्रकार परिषदेला अॅड.आण्णाराव पाटील, प्रहार शिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष कालिदास माने, कुलदिप ठाकूर, शेखर हविले, रामेश्वर धुमाळ,बसवंतप्पा उबाळे,कलिम सय्यद यांच्यासह समस्त लातूरकर संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले, या 12 जुलै च्या रजिस्ट्रीबाबतच्या परिपत्रकामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिक अडचणीत आलेले आहेत. याबाबत निवेदन, विनंत्या करूनही प्लॉटच्या रजिस्ट्रीचा प्रश्न मार्गी लागत नाही. हा राज्य शासनाचा 100 टक्के चुकीचा निर्णय आहे. यामुळे प्लॉटधारक व अल्पभूधारक नागरिकांवर मोठा अन्याय झालेला आहे. याबाबत रजिस्ट्री विभागाचे आय.जी.आर.हार्डिकर व करिम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही सकारात्मक चर्चा करून याबाबत वरीष्ठांकडे पाठपुरावा करू असे सांगितले आहे. आपणही याबाबत पाठपुरावा करून सर्वांना न्याय मिळवून देऊ असा विश्वासही माजी आ.कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी समस्त लातूरकर संघर्ष समितीचे समन्वयक कुलदिप ठाकूर, कालिदास माने, बसवंतप्पा उबाळे, रामेश्वर धुमाळ यांनीही विचार मांडले.
हायकोर्टात जनहित याचिका दाखल करू - आण्णाराव पाटील
रेखांकनाशिवाय रजिस्ट्रीच होत नसल्याने सर्वसामान्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या परिपत्रकामुळे सध्याचे महाविकास आघाडी सरकार हे जनतेच्या सोयीचे सरकार नसून जनतेच्या लुटीचे सरकार आहे, हे सिध्द झालेले आहे. राजकारणाचा स्तर उंचाविण्याऐवजी खालावलेला आहे. कायदेपटू असणारी माणसं कमी होत आहेत. त्यामुळे लोकशाही मार्गाने न्याय मिळणे. अडचणीचे होत आहे. त्यामुळे 12 जुलै 2021 रोजी काढलेल्या परिपत्रकाबाबतही योग्य तो न्याय मिळत नसेल तर यापुढील कालावधीत हायकोर्टात जनहित याचिका दाखल करून न्यायालयीन लढाई लढू असा विश्वास महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड.आण्णाराव पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
देशमुखांनी लक्ष घातले तर प्रश्न मार्गी लागेल - खंडापूरकर
लोकनेते विलासराव देशमुख साहेब असते तर हा प्रश्न तात्काळ मार्गी लागला असता.परंतु ते सध्या नाहीत. त्यामुळे लातूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा. त्यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना या विषयाबाबत बोलले तर हा विषय तात्काळ मार्गी लागेल. असा विश्वास अखील भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
No comments:
Post a Comment