ऑल इज वेल’ पुस्तकाचे प्रकाशन आज - latur saptrang

Breaking

Friday, October 1, 2021

ऑल इज वेल’ पुस्तकाचे प्रकाशन आज

 



मुंबई (प्रतिनिधी) : संघर्षातून यशाकडे जाण्याचा मूलमंत्र सांगणारे 'सकाळ' प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले संपादक, लेखक, निवेदक, संघटक संदीप काळे लिखित 'ऑल इज वेल' मनातला सक्सेस पासवर्ड या मराठी, हिंदी आणि इंग्लिश हे पुस्तक तीन भाषांमध्ये आपल्या भेटीसाठी येण्यास सज्ज झाले आहे. 

‘ऑल इज वेल’ चे प्रकाशन येत्या शुक्रवारी (१ ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह, मंत्रालयाच्या समोर, होणार आहे. हा पुस्तक प्रकाशन सोहळा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 

 संदीप काळे यांनी आपल्या आयुष्यातील खाचखळग्याने भरलेला हा प्रवास 'ऑल इज वेल'मध्ये मांडलेला आहे. आपल्या जीवनातील अनमोल ठेवा त्यांनी 'ऑल इज वेल'च्या माध्यमातून वाचकांना बहाल केला. या पुस्तकात आलेले प्रत्येक कठीण प्रसंग, सामान्य वाचकांच्या जीवनाशी निगडित आहेत. खडतर मार्गाने केलेला आयुष्याचा कठीण प्रवास, कसा यशाच्या शिखरापर्यंत जातो, हेच या पुस्तकाच्या प्रत्येक पानापानांतून लक्षात येते. दिशाहीन भरकटलेला तरुण शिक्षणाअभावी वाईट मार्गाला कसा लागतो, याचे सुद्धा अनेक प्रसंग लेखकाने मांडले आहेत. संदीप काळे यांनी स्वतःच्या जिद्दीने केलेला हा यशाचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

'ऑल इज वेल'मधून आशावादी निष्ठा आणि मनुष्याच्या उज्ज्वल भवितव्यासंबंधीचा एक विश्वास निर्माण होतो. संघर्ष, शिस्त, जिद्द आणि चिकाटीने भरलेला 'ऑल इज वेल'चा प्रवास आहे. 

 पुस्तकाच्या प्रकाशनपुर्वीच नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'ऑल इज वेल' हे पुस्तक येत्या शुक्रवारी १ ऑक्टोबरला मराठी, हिंदी आणि इंग्लिश तीन भाषांमध्ये वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक, प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहली आहे. 'सकाळ' प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ व मांडणी प्रतिभावंत चित्रकार डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांनी केली आहे. शरद पवार, अण्णा हजारे, प्रकाश आमटे, सिंधूताई सपकाळ, फ. मुं. शिंदे, श्रीराम पवार, डॉ. महेंद्र कल्याणकर, डॉ. मनोजकुमार शर्मा, यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे.

 या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला जेष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्य महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, खा. हेमंत पाटील, जेष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माजी अध्यक्ष फ. मुं. शिंदे, रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रकाशन सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकाळ प्रकाशन, सोरा मिडिया, व्हाईस ऑफ मिडियाच्या वतीने करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment