कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठविण्याचे  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश - latur saptrang

Breaking

Thursday, October 28, 2021

कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठविण्याचे  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई, दि. 27 : नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर फाऊंडेशन मार्फत कर्करोग उपचाराच्या सोयीसुविधा पुरविल्या जातात. या ठिकाणी कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी विभागीय कॅन्सर हॉस्पीटल आणि संशोधन संस्थेच्या विविध प्रश्नांसंदर्भातील बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव प्रकाश सुरवसे, राष्ट्रसंत तुकडोजी विभागीय कॅन्सर हॉस्पीटलचे उपाध्यक्ष डॉ. करतार सिंह, अशोक कृपलानी, अनिल माळवी, सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉ.कैलास शर्मा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, सध्या नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रेडिओथेरपी हा विभाग कार्यरत असून सदर विभागामार्फत कर्करोग उपचाराच्या काही सुविधा पुरविण्यात येतात. या विभागाचे श्रेणीवर्धन करुन येथे कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार असून आवश्यक बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर फाऊंडेशनमार्फत कर्करोग उपचार केले जात असून सदर संस्था शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय संस्थेच्या लगतच आहे. सदर संस्था शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विलिन करणे तसेच येथे स्वतंत्र कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात यावा. विभागामार्फत याबाबत अभ्यास करुन यासंदर्भात बैठक घेण्यात येईल.

श्री.केदार यांनी यावेळी सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने या आजारावरील अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर फाऊंडेशन येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला संलग्न करण्याची मागणी केली.

0000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3Eqih1g
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment