राज्यपालांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद; कृषी विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांची पाहणी - latur saptrang

Breaking

Wednesday, October 27, 2021

राज्यपालांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद; कृषी विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांची पाहणी

अहमदनगर, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे शेतीमध्ये आधुनिकता आणता आली. त्यामुळे  शेतीमध्ये उन्नती झाली असल्याची भावना राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्याशी  संवाद साधतांना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

प्रगतशील शेतकरी कृषीभूषण डॉ.दत्तात्रय बने, सुरसिंग पवार, मच्छिंद्र घोलप, विष्णू जरे, मेजर ताराचंद घागरे, राजेंद्र वरघुडे, प्रविण गाडे, मारूती गिते, प्रणव धोंडे, सविता नारकर, शिवाजी थोरात, संजीव माने, श्रीनिवास बागल, रामदास थेटे, राहुल रसाळ, सारंगधर निर्मळ, रविंद्र कडलग, अशोक खोत या शेतकऱ्यांनी राज्यपालांशी संवाद साधला.

यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनचा लाभ घेत आपल्या कल्पकतेने शेती करत उन्नती साधली. ही प्रशंसनीय गोष्ट आहे. काळानूरूप शेतकऱ्यांनी शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय केला तर शेती निश्चित फायदेशीर ठरेल. शेतकऱ्यांनी सकारात्मक विचार करत काम केले पाहिजे. सेंद्रिय शेती व जीआय टेक्नॉलॉजीचे ज्ञान शेतकऱ्यांनी प्राप्त केले पाहिजे. यातून शेतकऱ्यांना खूप फायदा होईल. शेतीमधील नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. ‘उत्तम शेती, मध्यम उद्योग, निकृष्ट नोकरी’ अशी पूर्वापार धारणा आहेच. कोरोना काळात सर्व बंद होते. मात्र शेती सुरु होती. शेतकरी शेतीत राबत होता, असेही राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

आपणास शेतीतून किती उत्पन्न होते, त्यातून आपल्याला नफा किती राहतो, आपण किती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे, शेतकरी गट स्थापन केले आहेत, आपल्या कामातून किती लोकांनी प्रेरणा घेतली,  किती लोक सेंद्रिय शेती करतात, यासारख्या प्रश्नांच्या माध्यमातून श्री.कोश्यारी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांची मते जाणून घेतली.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी अनिल पवार उपस्थित होते.

तत्पूर्वी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी राहुरी कृषी विद्यापीठाच्या विविध विभागांची पाहणी केली. यात माहिती व तंत्रज्ञान विभागातील विविध पिकांच्या वाणांची, गायीं व शेळींच्या संकरीत जातींची माहिती जाणून घेतली. त्यानंतर उद्यानविद्या विभाग, डाळींब संशोधन केंद्र, मनुष्यविरहित हवाई वाहन ( यूएव्ही ड्रोन) द्वारे केल्या जाणाऱ्या पिकावरील फवारणींची पाहणी केली. त्यानंतर सिंचन उद्यान विभाग व बेकरी उत्पादने प्रकल्पास राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/318T3Gf
https://ift.tt/3ny3kDs

No comments:

Post a Comment