'पोलीस स्वत: दुकानं बंद करायला सांगताहेत, ही कुठली पद्धत? हे कुठलं राज्य?' - latur saptrang

Breaking

Monday, October 11, 2021

'पोलीस स्वत: दुकानं बंद करायला सांगताहेत, ही कुठली पद्धत? हे कुठलं राज्य?'



मुंबई: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) शेतकरी विरोधी कायदे व लखीमपूर खेरी इथल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'वर (Maharashtra Bandh) भाजप पाठोपाठ आता मनसेनंही (MNS) टीका केली आहे. 'आता बंद पुकारणारे महाविकास आघाडीचे खासदार संसदेत शेतकरी विरोधी विधेयक मंजूर होत असताना शेपूट घालून का बसले होते?,' असा रोकडा सवाल मनसेनं केला आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी या बंदवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'लखीमपूरला घडलेली घटना दुर्दैवीच आहे. त्याचा निषेध झालाच पाहिजे, पण ज्या कृषी कायद्यांमुळं हे सगळं घडतं आहे, ते कृषी कायदे होत असताना संसदेत महाविकास आघाडीचे खासदार संसदेत शेपूट घालून का बसले होते? शिवसेनेच्या खासदारांची थोबाडं बंद का होती? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेत अनुपस्थित का होते?,' अशी प्रश्नांची सरबत्तीच संदीप देशपांडे यांनी केली आहे.



'लॉकडाऊनमुळं आज लोकांचं कंबरडं मोडलंय. कसेबसे ते सावरू पाहताहेत. सणासुदीत थोडाफार व्यापार होतो, नेमका त्याच वेळी हा सरकारपुरस्कृत बंद केला जातोय. दादरसारख्या भागांत स्वत: पोलीस फिरून दुकानं बंद करताहेत. ही कुठली पद्धत आहे आणि हे कुठलं राज्य आहे,' असा संतापही देशपांडे यांनी व्यक्त केला.

भाजप-मनसेची जवळीक?

'महाराष्ट्र बंद'ला मनसेचा विरोध हे भाजप-मनसे जवळ येण्याचे संकेत आहेत का, असा प्रश्नही देशपांडे यांना विचारण्यात आला. त्यावर, या घडामोडींशी राजकारणाचा कुठलाही संबंध जोडला जाऊ नये. जे चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर. भाजप जेव्हा चुकला तेव्हा राज ठाकरे (Raj Thackeray) साहेबांनी त्यांच्यावरही टीका केली आहे,' असं देशपांडे म्हणाले.

No comments:

Post a Comment