अतिवृष्टीने बाधित क्षेत्राच्या पाहणीसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे पोहोचले शेतीच्या बांधावर - latur saptrang

Breaking

Monday, October 4, 2021

अतिवृष्टीने बाधित क्षेत्राच्या पाहणीसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे पोहोचले शेतीच्या बांधावर

केज, दि. 4 : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीचे पात्र बदलून शेतात शिरले, अगदी दगड गोटे शेतात वाहून आले तर शेतातली माती खरडून वाहून गेली, याबाबत पिकांचा विमा व खरडून गेलेल्या जमिनीलाही मदत देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली असल्याचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा, केज तालुक्यातील उंदरी, अरणगाव आदी गावांचा दौरा केला. यावेळी त्यांनी नदीकाठच्या शेतांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच लवकरच या सर्व नुकसानीची मदत मिळणार असल्याचेही त्यांनी पठाण मांडवा येथील शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, पृथ्वीराज साठे, दत्ता आबा पाटील, राजपाल लोमटे, ताराचंद शिंदे, बाळासाहेब शेप, तानाजी देशमुख, रणजित चाचा लोमटे, बाळासाहेब सोनवणे, राजाभाऊ शेप, सुधाकर जोगदंड, अंबाजोगाईचे तहसीलदार विपीन पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.वाघमारे, यांसह कृषी आदी विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पुरात वाहून मृत्यू झालेल्या सोनवणे व सिरसाट कुटुंबियांचे सांत्वन

दरम्यान केज तालुक्यातील उंदरी येथील महादेव बळीराम सोनवणे व उत्तम बन्सी सोनवणे तसेच आरंबगाव येथील बालाजी सिरसाट यांचे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी निधन झाले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या तीनही कुटुंबियांची भेट घेऊन सोनवणे व सिरसाट परिवारांचे सांत्वन केले.

यावेळी तीनही कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदतीचा धनादेश श्री.मुंडे व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

या तीनही कुटुंबातील नातेवाईकांशी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी चर्चा करत त्यांच्या भविष्यातील निर्वाह, घरांची पडझड दुरुस्ती तसेच त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचीही ग्वाही दिली.

यावेळी नंदकुमार मोराळे, रत्नाकर शिंदे, विष्णू भाऊ चाटे, सारंग आंधळे, बालाजी तांदळे, चंदू चौरे, शिवलिंग मोराळे, संजय धस, सुरेश घुले, दादा चाटे, अझहर इनामदार, यांसह विभागीय अधिकारी शरद झाडके, केजचे तहसीलदार श्री. मेंडके, नायब तहसीलदार श्री. धस यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3A8gPOu
https://ift.tt/39f9xgE

No comments:

Post a Comment