अहमदनगर सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची चौकशी तात्काळ पूर्ण करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश - latur saptrang

Breaking

Sunday, November 7, 2021

अहमदनगर सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची चौकशी तात्काळ पूर्ण करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

अहमदनगर दि. 7 -(जिमाका ) – जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर येथील आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेने मला तीव्र दुःख झाले आहे. या दुर्घटनेसाठी नेमलेल्या चौकशी समितीने तात्काळ चौकशी पूर्ण करावी असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अतिदक्षता विभागाला काल अचानक लागलेल्या आगीसंदर्भात त्यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीत त्यांनी सामान्य रुग्णालय, महानगरपालिका, अग्निशमन,विद्युत वितरण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम पोलीस प्रशासन विभाग आदी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

डॉ.गोऱ्हे  यावेळी म्हणाल्या, भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून, रुग्णालयात नियमित देखरेख, येथील रुग्णांना उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची नियमित तपासणी होते का तसेच याबाबत कार्यप्रणाली ठरून त्याप्रमाणे कामकाज झाले पाहिजे. अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे,मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.बी.वारूडकर, जिल्हा संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विरेंद्र बडोदे उपस्थित होते. या बैठकीनंतर, डॉ.नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीची घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन  पाहणी केली.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3o96VYG
https://ift.tt/3BR7A68

No comments:

Post a Comment