जिल्हा रुग्णालयातील आगीमागचे धक्कादायक वास्तव उजेडात, जिथं आग लागली तिथं... - latur saptrang

Breaking

Sunday, November 7, 2021

जिल्हा रुग्णालयातील आगीमागचे धक्कादायक वास्तव उजेडात, जिथं आग लागली तिथं...



 अहमदनगर: नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयातील (Ahmednagar Civil Hospital Fire) ज्या अतिदक्षता विभागात आग लागून ११ जणांनी जीव गमावला, त्या ठिकाणी स्थायी अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नव्हती. अलीकडेच करण्यात आलेल्या फायर ऑडिटमध्ये ही गोष्ट रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे आता समोर आले आहे.

जिल्हा रुग्णालयात करोना रुग्णांसाठी विशेष वॉर्ड करण्यात आला होता. रुग्णांची संख्या वाढल्यानंतर त्याचेच अतिदक्षता विभागात रुपांतर करण्यात आलेले आहे. मात्र, हे करताना अग्निसुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे. करोना काळात आगी लागण्याच्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले. नगरच्या या रुग्णालयाचेही ऑडिट करण्यात आले होते. महापालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी यासंबंधी पाहणी करून अहवाल दिला होता. यामध्ये पथकाने काही त्रुटी दाखवून दिल्या होत्या. यात आगीच्या धोक्याची सूचना देणारी यंत्रणा (फायर अलार्म), आग लागलीच तर पाण्याचे फवारे फारण्याची सुविधा (स्प्रिकंलर), पाण्याचे पंप अशी स्थायी अग्निशमन यंत्रणा नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्याची तातडीने पूर्तता करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले.



याशिवाय जेथे घटना घडली, तेथे विजेच्या तारांचा गुंतायुक्त संच होता. तेथे शॉर्टसर्किट झाले असावे, तेथून ऑक्सिजनच्या पाइपने पेट घेऊन आग भडकत गेली असावी, असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग लागल्याचे लवकर लक्षात येण्यासाठी आणि ती अटोक्यात आणण्यासाठी तातडीने हालचाली करण्याची यंत्रणा हाताशी नसल्याने आग अटोक्यात आणण्यात अडचण आली असावी, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कक्षात पीओपी केले होते. त्यामुळे धूर वाढत गेला. शिवाय ग्रील आणि खिडक्या पक्के बंद केलेले असून एकच दरवाजा आहे. त्यामुळेही बचाव कार्यात अडचणी आल्याचे अग्निशामक दलाच्या पथकांनी सांगितले. त्रुटींची दखल घेत पूर्तता केली असती तर दुर्घटना टाळता येऊ शकली, असती असे आता बोलले जाऊ लागले आहे. अर्थात नेमकं सत्य चौकशीतून समोर येईल.


मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून पाच लाखांची मदत – पालकमंत्री हसन मुश्रीफ
अहमदनगर येथील सामान्य रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत दुर्दैवी – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

No comments:

Post a Comment