मुंबईतील कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरणसुद्धा तापलं आहे. गेल्या महिन्याभरापासून या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंनी केलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शंका उपस्थित केली. त्यानंतर काही पत्रकार परिषदा घेत मलिक यांनी वानखेडेंबाबत गौप्यस्फोट करत गंभीर असे आरोपही केले.
दरम्यान, शुक्रवारी आर्यन खान केसचा तपास एनसीबीच्या एसआयटीकडे देण्यात आला आहे. यानंतर समीर वानखेडेंनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, मला या तपासातून हटवण्यात आलेलं नाही. या प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थेतर्फे व्हावा यासाठी मीच न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरूनही नवाब मलिका यांनी वानखेडेंवर टीका केली.
नवाब मलिक यांनी शुक्रवारी ट्विट करून म्हटलं की, समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणासह एकूण ५ प्रकरणांच्या तपासातून हटवलं आहे. अशी २६ प्रकरणं असून त्यांचा तपास होण्याची गरज आहे. ही एक सुरुवात आहे आणि व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी अजून बरंच काही करण्याची आवश्यकता आहे, आम्ही ते करू असंही नवाब मलिक यांनी ट्विटरवर म्हटलं होतं.
शनिवारी नवाब मलिक यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी आपणच केली होती असा दावा केला आहे. आर्यन खानचे अपहरण केलं आणि खंडणी मागितली या प्रकरणी समीर वानखेडेंची चौकशी करावी अशी मागणी केली होती. आता केंद्र आणि राज्य अशा दोन एसआयटी स्थापन झाल्या आहेत. या दोन्ही पैकी कोण समीर वानखेडे आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचा खरा चेहरा समोर आणतं ते पाहुयात असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment