राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्या – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे निर्देश - latur saptrang

Breaking

Wednesday, November 10, 2021

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्या – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे निर्देश

मुंबई, दि. 10 : केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत देशभरात शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (National Achievement Survey) केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील तसेच सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले.

विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमधील संपादणूकीचे तसेच देशाच्या शिक्षण प्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करणे यासाठी होणाऱ्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या अनुषंगाने प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य आणि संबंधितांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा.गायकवाड यांनी संबंधित शिक्षणाधिकारी, प्राचार्य यांच्याशी सर्वेक्षणाच्या तयारीबाबत संवाद साधला आणि आढावा घेऊन मार्गदर्शन केले.

या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राज्य प्रकल्प संचालक राहूल द्विवेदी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.डी.सिंह, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महेश पालकर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अपर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना सर्वेक्षणाबाबत मार्गदर्शन केले.

प्रारंभी श्री.सिंह यांनी राज्यात होणारे सर्वेक्षण आणि त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. राज्य शासनामार्फत शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशभरात एकाच वेळी होणार असल्याने ग्रामीण व शहरी भागात प्रस्तुत सर्वेक्षणासाठी निवडलेल्या सर्व व्यवस्थापन, माध्यमाच्या शाळांतील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीचे वर्ग दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू राहतील. सदर सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळांतील संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच क्षेत्रीय अन्वेषक यांना या सर्वेक्षणाच्या प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वेक्षणासाठी राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या एकूण 7330 शाळांमधील 2 लाख 34 हजार 55 विद्यार्थ्यांची निवड केंद्र शासनामार्फत करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3Hb8leb
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment