धुळे: एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपाला झुगारून धुळे बस आगारातून आज बस सेवा सुरू करण्यात आली. सरळ भरतीत निवडलेल्या चालकांच्या माध्यमातून या बस धुळे आगारातून नरडाणा, धनूर अशा ठिकाणी पाठवल्या गेल्या. मात्र पोलीस बंदोबस्त असतानाही चार बसेसवर दगडफेक झाली आहे. या चारही बस वेगवेगळ्या मार्गावर पाठवण्यात आल्या होत्या. दगडफेकीच्या घटनांमुळे नव्याने सेवेत दाखल झालेल्या चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
धुळे बस आगारातून आज बस सेवा सुरू करण्यात आली. या बसेसना पोलीस सुरक्षा देण्यात आली होती. असे असतानाही अज्ञातांकडून या बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत एक चालक जखमी झाला आहे. नरडाणा येथून धुळ्याकडे येणाऱ्या बसवर नगावबारी येथे अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीच्या घटनेत विजय भामरे हे बस चालक जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली. या घटनेवर चिंता व्यक्त करताना अधिक सुरक्षा पुरवण्याची मागणी चालकांकडून करण्यात येत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना बस सोडल्या गेल्या तर अप्रिय घटना घडेल, अशी भीती पोलीस यंत्रणाना होती. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली. मात्र या बसेसच्या मार्गाबाबत आणि संख्येबाबत आगार प्रमुखांकडून पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्यामुळे ही घटना घडल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने आगार प्रमुखांना बस सोडण्याचे मार्ग आधी कळवण्यासंदर्भात सूचना केली आहे. मात्र दगडफेकीच्या या घटनेमुळे आता सुरू झालेली बस सेवा ही पुन्हा बंद होईल, अशी स्थिती दिसून येत आहे.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सध्या एसटी बससेवा जवळपास ठप्प आहे. सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यात चर्चा होऊनही अद्याप संपावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यात अनेक संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली असल्याने स्थिती दिवसेंदिवस चिघळतच चालली आहे. मुंबईत आझाद मैदान येथे एसटी कर्मचारी एकवटले असून राज्याच्या काही भागांतून मुंबईकडे निघालेल्या कर्मचाऱ्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे. त्यामुळेच कोंडी वाढून प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रातील प्रवाशांचे सध्या अनंत हाल होत आहेत.
No comments:
Post a Comment