विश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्नीवर किरीट सोमय्या यांचा आरोप - latur saptrang

Breaking

Sunday, November 21, 2021

विश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्नीवर किरीट सोमय्या यांचा आरोप

 


पिंपरी चिंचवड, 

जालना सहकारी साखर कारखान्यात अर्जुन खोतकर मित्र परिवाराने भागीदारीत बेनामी व्यवहार केला आहे. शेअर होल्डरमध्ये रुपाली विश्वास नांगरे-पाटील, नांगरे-पाटील यांचे सासरे पद्माकर मुळे यांचे नाव आहे. त्यामुळे मुंबईचा जॉईंट कमिशनर असलेल्या विश्वास नांगरे पाटलांनी हा बेनामी कारखाना विकत घेतला असा माझा दावा आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करा आणि तो पर्यत विश्वास नांगरे पाटलांना पोलीस दलातून मुक्त करावे अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी येथे केली.

भाजपाच्या पिंपरी कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, उपमहापौर नानी घुले, पक्षनेते नामदेव ढाके, प्रवक्ते अमोल थोरात, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, भाजपा महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष उमा खापरे आदी उपस्थित होते.

यावेळी सोमय्या म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार माफिया सरकार आहे. कधी धमकी देऊन तर कधी नौटंकी करून या सरकारचा कारभार चालला आहे. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी धमकी दिली. मात्र अनिल देशमुख यांच्यावर त्यांचे प्रेम आहे की, अजित पवार यांची त्यांना काळजी आहे असा सवाल सोमय्या यांनी केला. जरंडेश्वर मध्ये अजित पवार यांनी जे केले तेच अर्जुन खोतकर यांनी जालना साखर कारखान्यात केले. पद्माकर मुळे, रूपाली विश्वास नांगरे-पाटील हे भागधारक आहेत. जॉईंट पोलीस कमिशनर विश्वास नांगरे-पाटील यांना चौकशी होईपर्यंत सेवेतून मुक्त करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

गेल्या चोवीस महिन्यांत आपण शंभर घोटाळे बाहेर काढले. सहा मंत्र्यांना अटक किंवा जेलची हवा खावी लागली. 24 हून अधिक घोटाळ्यांची सीबीआय, आयकर, पोलिस द्वारा चौकशी सुरू आहे. 18 प्रकरणात न्यायालय, लोकायुक्त, एनजीटी, ग्रीन प्राधिकरण, मानव अधिकार आयोग, पोलीस प्राधिकरण सुनावणी सुरू आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment