विशेष पुनरीक्षण मोहीम मतदार नोंदणी अभियानास मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद – जिल्हाधिकारी राजीव निवतकर - latur saptrang

Breaking

Saturday, November 27, 2021

विशेष पुनरीक्षण मोहीम मतदार नोंदणी अभियानास मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद – जिल्हाधिकारी राजीव निवतकर

मुंबई, दि.27 : भारत निवडणूक आयोगाने दि. १ नोव्हेंबर, २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision Programme) जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हयातील 18 वर्षे पूर्ण तरुण-तरुणी, दिव्यांग, तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला आणि समाजाच्या वंचित घटकातील व्यक्ती यांची मतदार यादीत नाव नोंदणी होण्यासाठी विशेष प्रयत्न म्हणून दि. २७ नोव्हेंबर २०२१ रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. सदर मोहिमेच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हयातील १० विधानसभा मतदार संघामध्ये विविध घटकांसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. यास मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.

अंध व्यक्तींची मतदार नोंदणी
या विशेष शिबिरामध्ये १८२-वरळी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात नॅब (National Association for Blinds) या संस्थेतर्फ अंध व्यक्तींची मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरास राजीव निवतकर, जिल्हाधिकारी, मुंबई यांनीही उपस्थित राहून शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. सदर शिबीरास मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील अंध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी १२ मतदारांनी नांव नोंदणी केली तर ५ मतदारांनी नाव, पत्ता, फोटो इ. बाबत दुरुस्ती केली तर १ मतदाराने आपले नाव मतदार यादीतून कमी केले. सदर अंध व्यक्तींनी व त्यांच्यासोबत आलेल्या मतदारांनी या शिबीराबाबत समाधान व्यक्त केले.

देह व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी नोंदणी

त्याचबरोबर १७९- सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ कार्यालय व नागरी सेवा प्रबोधिनी आणि मुंबई जिल्हे एडस नियंत्रण संस्था मुंबई यांच्या संयुक्त विदयमाने कोकरी आगार, सायन येथे
आणि १८६-मुंबादेवी विधानसभा मतदार संघ कार्यालयाने आशा महिला संस्था यांच्या सहकार्याने मुंबादेवी विधानसभा कार्यक्षेत्रातील परिसरात देह व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी नांव नोंदणीबाबत शिबीर आयोजित करण्यात आले होते.
गृहनिर्माण संस्था
१७९-सायन-कोळीवाडा विधानसभा मतदार संघ कार्यालय व सहकार विभागातर्फ निसर्ग, चिंतामणी आणि अष्टविनायक गृहनिर्माण संस्था येथेही शिबीरांचे आयोजन करण्यात आले. त्यास मतदार नोंदणी अधिकारी, सायन-कोळीवाडा मतदार यांनी मार्गदर्शन केले.

पारधी समाजातील मतदारांसाठी नोंदणी

आदिवासी विकास विभाग व १८७-कुलाबा विधानसभा मतदार संघ यांच्या संयुक्त विदयामाने एअर इंडिया इमारत परिसरातील पारधी समाजातील मतदारांसाठी मतदार नोंदणीचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास माधव पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर यांनी मार्गदर्शन केले.

१८१- माहिम विधानसभा मतदार संघातर्फ नवजीवन सोसायटी, सागरदर्शन सोसायटी, कापड बाजार माहिम येथे सहकार विभागतर्फ तर सामाजिक न्याय विभागातर्फ श्रीमती कमला मेहता दादर अंधशाळा येथे अंध मतदारांसाठी शिबीर आयोजित करण्यात आली होती. मुंबई शहर जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरुन जिल्हयातील १० विधानसभा मतदार संघानी शासनाच्या विविध विभागांच्या सहकार्याने शिबीर आयेजित करुन मतदार नोंदणीचे काम यशस्वीपणे पार पाडले आहे.

उद्या रविवारी होणाऱ्या या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातही ज्या व्यक्तींनी मतदार म्हणून नोंदणी केली नाही किंवा त्यात काही बदल करायचे असल्यास उद्या दिनांक 28 नोव्हेंबरला होणाऱ्या या विशेष शिबिरास अवश्य भेट द्यावी, असे आवाहन श्री.निवतकर यांनी केले आहे.
000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3nZGohT
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment