सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या 19 जागांपैकी भाजपला ११ तर महाविकास आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत, विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली पराभूत झाले आहेत.
जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी चुरशीने मतदान झाले होते. दरम्यान, आज 31 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सिंधुदुर्गनगरी येथे शिक्षक पतपेढी सभागृहात मतमोजणी सुरु आहे. यात महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले. त्यांच्या विरोधात राणे गटातील विठ्ठल देसाई होते. दोघांनाही १७-१७ मते पडल्याने टाय झाले. अखेर चिठ्ठी काढून विठ्ठल देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.
काल झालेल्या मतदानावेळी जिल्ह्यातील एकूण 981 पैकी तब्बल 968 मतदारांनी म्हणजे 98.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 115 महिला व 853 पुरुषांचा समावेश होता.
‘म्याव-म्याव नाही तर तो डरकाळी फोडतो’
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने आघाडी घेतल्यानंतर कणकवलीत राणे समर्थक जल्लोष करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रमोद जठार यांनी, जर भाजप कार्यकर्त्याला कोंडीत पकडले तर तो म्याव-म्याव करत नाही. तर तो डरकाळी फोडतो, अशी प्रतिक्रिया देत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणानंतर कणकवलीत राजकीय आरोप-प्रत्योरापांनी वातावरण तापले आहे. गुरुवारी कणकवलीत झालेली जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रियाही तणावपूर्ण वातावरणात पार पडली होती. मतदान प्रक्रियेदरम्यान जि. प. अध्यक्ष संजना सावंत आणि महाविकास आघाडीचे पॅनेलप्रमुख सतीश सावंत यांच्यात मोबाईल नेण्यावरून जोरदार हमरीतुमरी झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून अनुचित प्रकार टाळला. याप्रकरणी संजना सावंत यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून सतीश सावंत यांच्यावर
कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दोन्ही बाजूंकडून म्याव म्याव आणि कॉक कॉक
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कणकवलीत पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. काल सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतर काही उत्साही शिवसैनिकांनी हायवे ब्रिजखाली फटाके वाजवत घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर समोरून भाजप कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी सुरू असताना दोन्ही बाजूंकडून म्याव म्याव आणि कॉक कॉक असे मांजर, कोंबड्याचे आवाज काढले जात होते. यावेळी उपस्थित पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांच्यामध्ये कडे केले होते. खबरदारीची उपाययोजना म्हणून दंगा काबू पथक तैनात करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment