सपा वॉशिंग मशीन, तिथे संघी सेक्युलर होतात
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2022) पार्श्वभूमिवर राजकारण तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सुरूवात केली आहे. त्याचबरोबर काही नेते अजूनही पक्ष बदलण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय. नुकतेच ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला. याशिवाय अनेक आमदार आणि कार्यकर्ते भाजप सोडून सपामध्ये दाखल झाले आहेत. आता भाजपचे अनेक आमदार सपामध्ये प्रवेश करणार असल्याचं सपाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. यावर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी टीका केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या पक्षांतराच्या राजकारावरून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला आहे. भाजप नेत्यांनी सपामध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमिवर त्यांनी ट्विट केलं की, 'सपा हे वॉशिंग मशीन आहे, ज्यामध्ये संघी धर्मनिरपेक्ष होतात. कल्याण सिंग, हिंदू युवा वाहिनीचे सुनील, स्वामी प्रसाद आणि आता हे... मुस्लिम सपा नेते त्यांना पोसतील आणि त्यांच्या 'सामाजिक न्यायासाठी' प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. बाकी बी-टीमचा टॅग आमच्यावर आहेच.
No comments:
Post a Comment