मुंबई: ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरकारसमोर पेच निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र, आता करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून तशा हालचालींना सुरुवात झाली आहे. आगामी काळात राज्यातील तब्बल २७ जिल्हापरिषदा आणि १० ते १२ नगरपालिकांची निवडणूक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी जागा वगळून या निवडणुका पार पडतील. राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच या निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर होणार होता. मात्र, ओमायक्रॉनचा वेगाने फैलाव होत असल्याने या संपूर्ण प्रक्रियेलाच ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही रुग्णसंख्या वाढल्यास महाराष्ट्रात लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले आहेत. करोनाचे रुग्ण वाढल्यास महाराष्ट्रात पश्चिम बंगालप्रमाणे मिनी लॉकडाऊन लागू शकतो. लोकल आणि शाळांवरही निर्बंध येऊ शकतात. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
मुंबई महापालिका (BMC) अधिकाऱ्यांची सोमवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. मुंबई आणि राज्यातील सद्यपरिस्थिती बघता, आज किंवा उद्यापर्यंत शाळा, महाविद्यालये खुली ठेवण्यासंदर्भात आणि मुंबई लोकलसंदर्भात महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागांना कंटेन्मेंट झोन घोषित करून प्रवेशबंदी केली जाऊ शकते, हा एक पर्याय असू शकतो. मुंबई लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीसंदर्भात मुख्यमंत्री गंभीर आहेत. कॅबिनेट आणि टास्क फोर्सच्या बैठकीत पश्चिम बंगालप्रमाणे अंशतः लॉकडाउनसारखा निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनीही दिले लॉकडाउनचे संकेत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना राज्यात लॉकडाउन लागू केले जाण्याची शक्यता आहे, असे संकेत दिले आहेत. करोना संसर्ग असाच वाढत राहिला तर, राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, यासंदर्भात मुख्यमंत्री जे निर्णय घेतील, ते राज्याच्या सर्व भागांत लागू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment