बीड : वाळू माफियांनी वाळू चोरीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झालेली घटना संपते न संपते तोच आता खून अन् खुनी हल्ल्यांच्या घटनांचा आलेख वाढत आहे. ‘क्राईम कंट्रोल’मध्ये म्हणणाऱ्या यंत्रणेने आता सगळं चांगलंय फक्त खून आणि खूनी हल्ले सुरुयेत असेच म्हणायला हवे.
मागील तीन दिवसांत एकट्या परळी शहर व परिसरात खुनाच्या चार घटना घडल्या आहेत. तर, केज तालुक्यात पुन्हा खुनाची एक घटना समोर आली आहे. खुनाचे सत्र एकीकडे सुरु असताना तलवारीने वार, भर कार्यालयात गोळीबार अशाही घटना सुरु आहे. पोलिस दलाकडून क्राईम कंट्रोलमध्ये असल्याचे जोरकसपणे सांगितले जात असले तरी मग हे नेमकं काय सुरुय आणि या अपयशाचा धनी कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
चोऱ्या, मारामारीच्या घटना तर वाढल्याच आहेत. मात्र, स्त्री अत्याचार, बलात्कार, दरोडे, प्राणघातक हल्ले आणि खुनांच्या घटनांचा आलेखही वाढत आहे. मात्र, पोलिस दलाकडून तुलनात्मक आकडेमोड करुन ‘क्राईम कंट्रोल’मध्ये असल्याचे नेहमीच सांगितले जाते. मग सगळं कसं चांगलं अन् सुरळीत असताना फक्त खून आणि खुनी हल्ले तेवढे सुरु आहेत, असेच म्हणायचे बाकी राहतेय.
वाळूचा विषय महसूल आणि पोलिस या दोघांत येतो. गुटखा अन्न व औषधी प्रशासन व पोलिसांच्या अखत्यारित येतो. तसे या दोन्ही गोष्टी जिल्ह्यात कमी नाहीत. काहीच दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यात वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यात चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिस व महसूल यंत्रणा हालली. काही उपाय योजनाही करण्यात आल्या आहेत. गुटख्याच्याही कारवाया होत आहेत. मात्र, गंभीर गुन्ह्यांच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत.
No comments:
Post a Comment