मालेगाव :
कर्नाटक राज्यात महाविद्यालयांमध्ये बुरखा घालून येण्यावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद मालेगावातदेखील उमटू लागले आहेत. सोमवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मोर्चा काढून विरोध प्रदर्शन केले होते, तर मंगळवारी (दि. 8) जमियत उलमा या संघटनेची बैठक होऊन या विषयावरून चर्चा झाली. त्यात येत्या शुक्रवारी (दि.11) ‘हिजाब डे’ साजरा करण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
कर्नाटक राज्यात काही महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालून प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यानंतर यावरून बुरखा विरुद्ध भगवा असा विद्यार्थी संघटनांमधून वाद सुरू झाला आहे. सध्या हे ड्रेसकोड प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी, त्याचे पडसाद मालेगावात उमटू लागले आहेत. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माच्या रीतीरिवाजानुसार आचरण करण्याचा अधिकार असताना अशाप्रकारे बुरखा घालण्यास विरोध करणे चुकीचे असल्याची भूमिका मांडली जात आहे. याबाबत महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी बुरखाधारी महिलांनी मोर्चा काढून निदर्शन केले होते. त्यानंतर, मंगळवारी (दि. 8) जमियत उलमा या धार्मिक संघटनेच्या नयापुरा भागातील कार्यालयात आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्या अध्यक्षतेखाली धर्मगुरूंची बैठक पार पडली. त्यात मोहम्मद इम्रान असजद नदवी यांनी कर्नाटक प्रकरणाची माहिती दिली. यानंतर मौलाना इम्तियाज इक्बाल यांनी हिजाबसंदर्भात देशातील सद्यस्थितीवर प्रकाश टाकत काही सूचना मांडल्या. त्यानंतर सर्वानुमते हिजाब बंदीच्या विरोधात दि. 10 फेब्रुवारी रोजी अजीज कल्लू अकादमी मैदानावर बैठक घेण्याचे निश्चित झाले.
त्यात हिजाब परिधान केलेल्या महिलांचा दुपारी 4 ते 5 या वेळेत जनजागृतीपर कार्यक्रम होईल. जमियत उलेमाच्या वतीने महिला प्रतिनिधींमार्फत अधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तर, शुक्रवारी (दि.11) शहरात हिजाब दिन साजरा करण्याचा दुसरा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दिवसभर 3 वर्षापासून पुढील सर्व बालिकांपासून वयोवृद्ध महिला बुरखा, हिजाब परिधान करूनच सार्वजनिक ठिकाणी वावरावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याशिवाय, जमियत उलेमाचे प्रतिनिधी शुक्रवारी शाळा आणि मदरशांमध्ये विद्यार्थ्यांकडून निष्ठेची शपथ वाचून घेतील. शुक्रवारच्या नमाजपूर्वी सर्व मशिदींमध्ये हिजाबचे महत्त्व आणि उपयुक्तता सांगितली जावी, असे यावेळी ठरले. या बैठकीला मौलाना इम्तियाज इक्बाल, मौलाना इम्रान असजद नदवी, नियाज अहमद लोधी, मुफ्ती हमीद जफर, मौलाना सिराज अहमद नदवी, मौलाना जहीर अहमद, हाफिज मुख्तार जमाली, अलहज अनिस अहमद फहमी, मौलाना ओबेद-उर-रहमान अब्दुल बारी कासमी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment