वक्फ जमीन घोटाळ्यात आष्टीतील बडे मासे; नायब तहसीलदार, मंडळाधिकाऱ्याला अटक
आष्टी (जि.बीड) : तालुक्यात गाजत असलेल्या वक्फ बोर्ड इनामी जमीन घोटाळ्या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. तालुक्यातील चिंचपूर येथील प्रकरणात तत्कालीन नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे व मंडळाधिकारी शिवशंकर सिंघनवाड यांना अटक करण्यात आली आहे. आज शुक्रवारी (ता.१८) पहाटे दोनच्या सुमारास विशेष तपास पथकाने (एसआयटी) ही कारवाई केली. प्रदीप पांडुळे हे आष्टी (Ashti) तालुक्यात सुमारे आठ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांची परांडा (जि.उस्मानाबाद) येथे बदली झालेली आहे, तर शिवशंकर सिंघनवाड हे सध्या टाकळसिंग व हरिनारायण आष्टा येथे मंडळाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील इनामी जमिनींच्या घोटाळ्यांचे प्रकरण गाजत आहे. (Waqf Land Scam, Two Top Officers Arrested In Ashti In Beed)
या प्रकरणात देवस्थानांच्या जमिनींवर परस्पर नावे लावून संगनमताने जमिनी हडप करण्याचा प्रकार उघड झालेला आहे. या प्रकरणाचा गाजावाजा झाल्यावर शासनाच्या वतीने प्रकरणांच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. याच पथकाने चौकशीअंती तालुक्यातील चिंचपूर येथील वक्फ बोर्डाचे प्रकरणी (Waqf Land Scam) आज पहाटे ही कारवाई केली आहे. तालुक्यातील चिंचपूर, रूईनालकोल व देवीनिमगाव येथे वक्फ बोर्डाच्या जमिनी हडपल्या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. चिंचपूरच्या प्रकरणात यापूर्वी काही जणांना अटक झाली होती. नंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. तसेच उपजिल्हाधिकारी दर्जाच्या दोन अधिकार्यांचाही सहभाग यात उघड झालेला आहे. आता आष्टीत काम केलेला नायब तहसीलदार व मंडळाधिकारी यांनाही एसआयटीने चौकशीअंती अटक केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण ?
आष्टी तालुक्यातील हिंदू व मुस्लिम देवस्थानांच्या इनामी जमिनींवर परस्पर दुसर्याचे नाव लावून जमिनी हडपण्याचा प्रकार उघड झालेला आहे. यात हिंदू देवस्थानच्या वतीने अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, वक्फ बोर्डाने याची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा वक्फ अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आष्टी तालुक्यातील चिंचपूर, रूईनालकोल व देवीनिमगाव अशा तीन ठिकाणचे स्वतंत्र गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यात यापूर्वी काही जणांना अटकही झाली होती
No comments:
Post a Comment