उत्तराखंडमध्ये आज मतदान, युपीतही दुसर्या टप्प्यातील मतदान
देहरादून/पणजी :
पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमामधील उत्तराखंड आणि गोवा या राज्यातील सर्व जागांवर उद्या, सोमवारी (ता. 14) मतदान होत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. पण केंद्र सरकारच्या धोरणांवर सातत्याने टीका करत असलेल्या काँग्रेस आणि आप या विरोधी पक्षांचीही या राज्यांमध्ये या मतदानात कसोटी लागणार आहे. दरम्यान, भाजपचीच सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशातही दुसर्या टप्प्यातील 55 जागांवर सोमवारीच मतदान होत आहे.
कोरोनाच्या तिसर्या लाटेमुळे यावेळी प्रचारावर बरीचशी बंधने आली होती. तरीही सर्व पक्षांनी पूर्ण जोर लावला आहे. गोव्यात भाजप, काँग्रेससह स्थानिक पक्ष तर उत्तराखंडातही भाजप, काँग्रेससह स्थानिक पक्ष रिंगणात आहेत. पण दोन्ही राज्यात यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आपची चर्चा आहे. तर गोव्यामध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांचा तृणमूल काँग्रेसही रिंगणात आहे. उत्तराखंडमध्ये राज्याच्या स्थापनेपासूनची ही पाचवी निवडणूक आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर हे महत्वाचे उमेदवार आहेत.
उत्तराखंडात सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, माजी मुख्यमंत्री हरिष रावत, सत्पाल महाराज, सुबोध उनियाल, अरविंद पांडे, धनसिंग रावत, रेखा आर्या, मदन कौशिक, यशपाल आर्या, गणेश गोडियाल, प्रितम सिंग हे महत्त्वाचे उमेदवार रिंगणात आहेत.
दृष्टिक्षेपात गोवा
मतदारसंघ : 40
उमेदवार : 301
मतदार : 11
लाखांहून अधिक
दृष्टिक्षेपात उत्तराखंड
मतदारसंघ : 70
उमेदवार : 632
मतदार : 81 लाख
युपीतही दुसर्या टप्प्यातील मतदान
लखनौ : हरिओम द्विवेदी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दुसर्या टप्प्यात सोमवारी नऊ जिल्ह्यांतील 55 विधानसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बदायूं, बरेली आणि शाहजहानपूर या जिल्ह्यांतील जागांचा समावेश आहे. याच टप्प्यात ध्रुवीकरणाच्या राजकारणाची खरी चाचणी होणार आहे. कारण, या 9 पैकी 8 जिल्ह्यांत मुस्लिम समुदायाची लोकसंख्या 23 ते 50 टक्के आहे.
मुस्लिम मतदारांची संख्या पाहूनच या टप्प्यात सर्व पक्षांचे मिळून 77 मुस्लिम उमेदवार रिंगणात आहेत. यात बसपाचे 23, काँग्रेसचे 21, सपाचे 18 आणि एआयएमआयएमचे 15 मुस्लिम उमेदवार आहेत. भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही; मात्र भाजपचा सहकारी पक्ष अपना दलने स्वार मतदारसंघातून मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले आहे. दलित आणि इतर मागास जातींच्या मतदारांचीही संख्या अनेक मतदारसंघांत विजय-पराजय ठरविण्याइतपत आहे. गतविधानसभा निवडणुकीत भाजपने या टप्प्यातील 58 पैकी 38 जागा जिंकल्या होत्या.
हे मंत्री रिंगणात
योगी सरकारमधील मंत्री सुरेश खन्ना नवव्यांदा शाहजहानपूरमधून रिंगणात आहेत. बिलासपूरमधून राज्य मंत्री बलदेव सिंह औलख, बदायूंतून राज्यमंत्री महेशचंद्र गुप्ता, चंदौसी येथून शिक्षण राज्यमंत्री गुलाब देवी, डॉ. धर्म सिंह सैनी नकूड येथून रिंगणात आहेत.
12 उमेदवार निरक्षर
या टप्प्यात 586 उमेदवार रिंगणात आहेत. यात 12 निरक्षर असून 144 उमेदवार केवळ आठवी पास आहेत. 102 उमेदवार पदवीधर आणि 6 उमेदवार पीएच. डी. धारक आहेत.
- 9 जिल्ह्यांतील 55 जागांवर
586 उमेदवार रिंगणात - पाच मंत्री, आयाराम
गयारामांची प्रतिष्ठा पणाला - 77 मुस्लिम उमेदवार
No comments:
Post a Comment