अहमदनगर : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील कुख्यात चंदन तस्कर सुभाष भिमराज दिलवाले (वय ४७) याला एका साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३७० किलो चंदन आणि इनोव्हा कार असा सुमारे १८ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिलवाले याच्याविरूद्ध यापूर्वी चंदनतस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सुमारे ११ वर्षापूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यातही तो आरोपी होता. पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशयावरून गावातील एकाचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर होता. आता हाच चंदनतस्कर दिलवाले पुन्हा एकदा पकडला गेला आहे.
कोतवाली पोलिसांनी गुरूवारी पहाटे नगर शहरात सुभाष भिमराज दिलवाले (वय ४७) आणि राजेंद्र रंगनाथ सासवडे (वय ३० दोघे रा. चिंचोडी पाटील ता. नगर) यांना पकडले. आरोपी चंदन तस्करी करत असून माल घेऊन ते नगरमधून जात असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार चांदणी चौकाजवळ सैनिक लॉन्सच्या समोर पोलिसांनी आरोपींना पकडले. ते दोघे इनोव्हा कारमधून (एमएच १२ जेयू ५६४४) मधून जात होते. त्यांच्याकडे ३७० किलो चंदानाची लाकडे आढळून आली. पोलिसांनी चंदन, कार आणि मोबाईल असा १८ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील आरोपी सुभाष दिलवाले चंदन चोरीसाठी कुख्यात आहे. त्याच्याविरूद्ध यापूर्वी अनेकदा कारवाई झाली आहे. चिचोंडी पाटील येथील बाळासाहेब लाटे यांचा खून झाला होता. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून चंदनतस्कर सुभाष दिलवाले व त्याच्या साथीदारांनी लाटे यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. विशेष म्हणजे त्यावेळी पोलीस त्याला पाठीशी घालत होते, असा गावकऱ्यांचा आरोप होता.
गुन्हा घडल्यानंतर दिलवाले याला तातडीने अटक झाली नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. याचा राग येऊन पोलिसांनी गावकऱ्यांवरच कारवाई केली होती. तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री गावात येऊन आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनाच मारहाण केल्याचा आरोप झाला होता. याविरोधात दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलन केले होते. त्यानंतर दिलवाले याला अटक झाली होती. मधल्या काळात त्याच्या कारवाया थंडावल्या असल्या तरी आता पुन्हा सुरू झाल्याचं आजच्या कारवाईवरून दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment