तेलंगणा सख्खा शेजारी, त्याच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - latur saptrang

Breaking

Sunday, February 20, 2022

तेलंगणा सख्खा शेजारी, त्याच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २० : – तेलंगणा महाराष्ट्राचा सख्खा शेजारी आहे. त्याच्याशी जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी निगडीत क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासमवेत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आंतरराज्यीय संयुक्त जलसिंचन प्रकल्पांविषयीही विस्तृत चर्चा झाली.

या शिष्टमंडळासमवेतच्या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आदी उपस्थित होते.

बैठकीत बाभळी बंधारा,  तुम्मीदीहेटी, मेडीगड्डा बॅरेज, चन्खा-कोरटा बॅरेज या सिंचन प्रकल्पांच्या अनुषंगाने चर्चा झाली. तसेच उभय राज्यात सुरु असलेल्या उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील विविध योजना, प्रकल्पांचीही चर्चा करण्यात आली. जलसिंचन प्रकल्पांतील आंतरराज्यीय सहकार्य आणि त्यातील विविध तरतुदींबाबतही यावेळी विस्ताराने ऊहापोह करण्यात आला. दोन्ही राज्यांदरम्यानचे विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवणाऱ्या उपाययोजनांवर भर देण्याबाबतही चर्चा झाली.

मुख्यमंत्री श्री. राव यांच्या समवेतच्या शिष्टमंडळात खासदार रणजित रेड्डी, खासदार संतोष कुमार, खासदार बी. पी. पाटील, आमदार पल्ला राजेश्वर रेड्डी, आमदार श्रीमती के. कविता, तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे महासचिव श्रवण रेड्डी, तसेच ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज आदींचा समावेश होता.

सुरवातीला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मुख्यमंत्री श्री. राव यांचे पुष्पगुच्छ, शाल तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री श्री. राव यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचाही सत्कार केला. मुख्यमंत्री श्री. राव यांच्यासमवेतच्या शिष्टमंडळातील सदस्यांचेही पुष्पगुच्छ आणि तसेच ‘महाराष्ट्र देशा’, ‘पहावा विठ्ठल” देऊन स्वागत करण्यात आले.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/ipByu3f
https://ift.tt/EZSDweo

No comments:

Post a Comment