उत्तर प्रदेशात ओवेसी यांच्या कारवर गोळीबार; दिल्लीकडे निघाले असतानाच... - latur saptrang

Breaking

Thursday, February 3, 2022

उत्तर प्रदेशात ओवेसी यांच्या कारवर गोळीबार; दिल्लीकडे निघाले असतानाच...


उत्तर प्रदेशात ओवेसी यांच्या कारवर गोळीबार; दिल्लीकडे निघाले असतानाच...

 मेरठ: उत्तर प्रदेशात प्रचारासाठी आलेले एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी हे मेरठ येथून दिल्लीकडे निघाले असतानाच एका टोलनाक्याजवळ त्यांच्या कारवर तीन ते चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या असून या हल्ल्यात ओवेसी यांना कोणतीही इजा झालेली नाही. याबाबत खुद्द ओवेसी यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ( Asaduddin Owaisi Latest Breaking News )


उत्तर प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. या निवडणुकीत ओवेसी याचा एमआयएम पक्षही उतरला असून ओवेसी यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. आज ते मेरठमधील किठौर येथे प्रचारासाठी आले होते. तेथील कार्यक्रम आटोपून ते दिल्लीकडे निघाले असतानाच त्यांना अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केले. 'तीन ते चार हल्लेखोर होते. त्यांनी छिजारसी टोल नाक्याजवळ माझ्या कारवर गोळ्या झाडल्या. एकूण चार राउंड फायर करून ते पसार झाले. हातातील शस्त्र तिथेच फेकून ते निसटले आहेत. माझ्या कारचा टायर पंक्चर झाला असला तरी मला वा इतर कुणाला कोणतीच इजा झालेली नाही. आम्ही सर्वजण सुखरूप आहेत. दुसऱ्या कारने आम्ही पुढे निघालो आहोत', असे ट्वीट ओवेसी यांनी केले आहे. 
ओवेसी यांच्या कारवर गोळीबार झाल्याचाी माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहचले आहेत. महत्त्वाचे म्हणजे येथे गोळीबार झालाच नाही, असा दावा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी केला आहे  सरकारमधील मंत्री मोहसीन रझा यांनी ही घटना गंभीर असल्याचे नमूद केले असून याप्रकरणी चौकशी करण्यात येईल व दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रक्षोभक भाषणे केली जात आहेत. लोकांना भडकावले जात आहे. ही बाबही गंभीर असल्याचे रझा म्हणाले. ज्यांना पराभवाची भीती वाटत आहे तेच उत्तर प्रदेशात लोकांना चिथावणी देत असल्याचा मोघम आरोपही त्यांनी केला.



No comments:

Post a Comment