मेरठ: उत्तर प्रदेशात एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळ्या झाडण्यात आल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी अवघ्या काही तासांतच पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे. याबाबत हापुडचे पोलीस अधीक्षक दीपक भुकर यांनी माहिती दिली. ( Shots Fired At Asaduddin Owaisis Car )
असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे हत्यार आढळून आले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे, असे दीपक भुकर यांनी सांगितले. ज्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे त्याचा साथीदार पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, असेही भुकर यांनी नमूद केले. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आम्ही ताब्यात घेतले असून ते तपासले जात आहे, असेही ते म्हणाले.
असदुद्दीन ओवेसी यांनी दिल्लीत दाखल झाल्यानंतर घटनेबाबत माध्यमांना अधिक माहिती दिली आहे. एका शूटरला ताब्याच घेतल्याची व हत्यार जप्त केल्याची माहिती मला पोलिसांनी दिली आहे. जी घटना घडली आहे त्याची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी अशी मागणी मी निवडणूक आयोगाकडे करत असून ही जबाबदारी अर्थातच उत्तर प्रदेश सरकार आणि मोदी सरकारची असल्याचे ओवेसी म्हणाले. याबाबत आपण लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार असून घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घालणार असल्याचेही ओवेसी यांनी सांगितले. माझे शत्रू अनेक आहेत. माझ्या जीवाला धोका आहे. याआधीही अनेकदा माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. माझ्या घरावरही हल्ले झाले आहेत. याची सरकारने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी ओवेसी यांनी केली.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या रंगली आहे. ओवेसी यांच्या एमआयएम पक्षानेही निवडणुकीत आपले उमेदवार उतरवले आहेत. आज ते मेरठ येथे प्रचारासाठी आले होते. किठौर येथील कार्यक्रम आटोपून ते दिल्लीकडे निघाले असतानाच छिजारसी टोल नाक्याजवळ ओवेसी यांना लक्ष्य करण्यात आले. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर चार गोळ्या झाडल्या व हल्लेखोर पसार झाले. ओवेसी यांनी तीन-चार हल्लेखोर होते व त्यांनी चार गोळ्या झाडल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात दोन हल्लेखोर होते, अशी माहिती मिळत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव सचिन तर फरार झालेल्या व्यक्तीचे नाव शुभम असल्याचेही सांगण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment